पृथ्वी फिरते, आपण का नाही फिरत? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
आपण सर्व पृथ्वीवर उभे आहोत, पण पृथ्वी एका सेकंदासाठीही थांबत नाही ती सतत फिरते. मात्र तरीही आपल्याला तिचं फिरणं का जाणवत नाही? आपल्याला चक्कर का येत नाही? यामागे वैज्ञानिक कारणं आहेत जी जाणून घेणं खूप रंजक आहे.

पृथ्वी दररोज जवळपास 1000 मैल प्रति तास वेगाने स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि सौरमालेत सूर्याभोवतीही अविश्वसनीय वेगाने परिक्रमा करते. तरीसुद्धा आपण या फिरण्याचा काहीही अनुभव घेत नाही. न आपल्याला चक्कर येते, न आपल्याला झटका बसतो. हे ऐकायला थोडं अजब वाटतं, पण यामागे आहे विज्ञानाचं कमालीचं गणित.
पृथ्वी एका स्थिर आणि एकसंध वेगाने फिरते. म्हणजेच, तिच्या फिरण्यात कोणताही अचानक बदल होत नाही न वेग वाढतो, न कमी होतो, न थांबतो. हे अगदी तसंच आहे जसं आपण एखाद्या सरळ रस्त्यावर कार चालवतो तेव्हा आपल्याला गाडी चाललीय याची जाणीव होत नाही, पण अचानक ब्रेक लावल्यानं किंवा वळण घेतल्यावर झटका बसतो. पृथ्वीच्या फिरण्यामध्ये मात्र असा कोणताही झटका किंवा वळण नाही, म्हणून आपल्याला काहीच जाणवत नाही.
कधी कधी असा प्रश्नही पडतो की, आपल्या इंद्रियांची संवेदनशीलता इतकी कमी आहे का? पण खरं म्हणजे माणसाच्या इंद्रिया अत्यंत तीव्र असतात. लिफ्ट थांबली तरी हलकासा झटका लागतो, ट्रेन वळली तरी आपल्याला जाणवतं. पण पृथ्वीचं फिरणं इतकं स्थिर आणि सुरळीत आहे की आपल्या शरीराला काहीच बदल जाणवत नाही.
विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं, तर पृथ्वीच्या फिरण्यामागे ‘कोनात्मक संवेग’ (Angular Momentum) जपण्याचा नियम आहे. जेव्हा पृथ्वी अवकाशातील धूळ आणि वायूंमधून तयार झाली तेव्हा ती फिरतच तयार झाली. जसं नळातून पाणी फिरत फिरत खाली पडतं, तसंच पृथ्वीही तयार झाली आणि त्या वेळेपासून ती फिरते आहे आजही तोच वेग कायम आहे.
पृथ्वीच्या फिरण्याचा काही परिणाम होत नाही असं नाही. प्रत्यक्षात, भूमध्य रेषेच्या जवळ असणाऱ्या लोकांना इतर भागांपेक्षा थोडंसं हलकं वाटतं, कारण पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणाऱ्या केन्द्राभिमुख शक्तीचा परिणाम तिथे जास्त असतो. पण हा फरक इतका सूक्ष्म असतो की तो आपल्याला जाणवत नाही.
याशिवाय, पृथ्वी सूर्याभोवतीही अविश्वसनीय वेगाने सुमारे 1,07,000 किमी/तास वेगाने फिरते. तरीही आपल्याला काही झटका लागत नाही, याचं कारण म्हणजे ही परिक्रमा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली “फ्री फॉल”सारखी होते. जसं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तसंच पृथ्वीही सूर्याभोवती फिरते एका विशिष्ट आणि स्थिर मार्गाने.
थोडक्यात सांगायचं झालं तर, पृथ्वी सतत फिरतेय स्वतःभोवती आणि सूर्याभोवतीही, पण तिची गती एकसंध आणि स्थिर असल्यामुळे आपल्याला काहीच जाणवत नाही. हे केवळ निसर्गाचं अद्भुत विज्ञान नाही, तर आपल्या जगण्याच्या अविभाज्य भागाचं एक अदृश्य पण आश्चर्यजनक रूप आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी आकाशात पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा आपण एका फिरत्या गोळ्यावर उभं आहोत, आणि तरीही स्थिर आहोत.
