फेसबुकवर लाईव्ह करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू, 7 जण जखमी

दिवसेंदिवस सोशल मीडियाचा अतिवापर जीवघेणा ठरत आहे. अशीच जीवावर बेतलेली एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना अपघात होऊन 2 भावांचा मृत्यू झाला आहे.

फेसबुकवर लाईव्ह करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू, 7 जण जखमी

नागपूर : दिवसेंदिवस सोशल मीडियाचा अतिवापर जीवघेणा ठरत आहे. अशीच जीवावर बेतलेली एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना अपघात होऊन 2 भावांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे फेसबूक लाईव्ह करणाऱ्याच्या मृत्यूनंतरही हे लाईव्ह काहीवेळ सुरुच होते.

रविवारी (16 जून) नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात हा अपघात झाला.  पुंकेश पाटील कार चालवत होता, तर त्याचा भाऊ संकेत पाटील मोबाईलवरून फेसबूक लाईव्ह करत होता. चालत्या कारमध्ये फेसबूक लाईव्ह करत असतानाच दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात पुंकेश पाटील आणि त्याचा भाऊ संकेतचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. पुंकेशच्या फेसबूक अकाऊंटवरुन हे फेसबूक लाईव्ह सुरु होते. सर्वात धक्कादायक म्हणजे दोन्ही भावांच्या मृत्यूनंतरही फेसबूक लाईव्ह सुरुच होते.

फेसबुक लाईव्ह करताना अपघाताच्या नागपुरात अनेक घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियाचा अतिवापर तरुणांसाठी जीवघेणा ठरवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार येत्या काळात अशाप्रकारे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली.

नागपूर जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी वेणा डॅममध्ये फेसबूक लाईव्ह करताना नाव पलटली. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारे रामा डॅममध्येही सेल्फीच्या नादात अपघात झाला आणि तरुणांचा जीव गेला होता. देशभरात चित्तथरारक सेल्फी काढण्याच्या नादात अनेक अपघात झाले आहेत. देशभरात अशा घटनांमध्ये हजारो लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या अतिवापरातून वाढलेला मृत्यूचा आकडा सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे.


Published On - 3:33 pm, Mon, 17 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI