हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

मध्य प्रदेशात रतलाममधील काही भक्त 'कोरोना'ची लक्षणे दिसल्यास अंधश्रद्धेतून या भोंदूबाबाच्या दरबारी जात असत. (Baba Kissing Hands Corona)

हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

भोपाळ : ‘कोरोना’वर वैद्यकीय उपचार करुन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही काही जण अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसत आहेत. हाताचे चुंबन घेऊन ‘कोरोना’वर उपचार करत असल्याचे सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचाच कोरोनाने मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रतलाममध्ये हा प्रकार समोर आला आहे. चिंतेची बाब म्हणजे त्याचे 19 भक्तही पॉझिटिव्ह आले आहेत. (Baba Kissing Hands Claiming Corona Treatment Dies in Ratlam Madhya Pradesh)

रतलाममधील नयापुरा भागात काही भक्त ‘कोरोना’ची लक्षणे दिसल्यास अंधश्रद्धेतून या कथित बाबाच्या दरबारी जात असत. मंत्रोच्चार करुन ‘कोरोना’ला पळवून लावत असल्याचा दावा तो करत असे. मात्र 4 जून रोजी हा भोंदूबाबा स्वतःच कोरोनामुळे मृत्युमुखी पडला. त्यानंतर या भोंदूबाबाकडे उपचार करण्यासाठी गेलेल्या भक्तांचे ‘कोरोना’ रिपोर्टही एका मागून एक पॉझिटिव्ह येऊ लागले आणि रतलाममध्ये एकच खळबळ उडाली.

भक्तांच्या हाताचे चुंबन घेऊन त्यांना ‘कोरोना’मुक्त करण्याचा दावा करणारा भोंदूबाबा स्वतः कोरोनाग्रस्त होता. मात्र त्यानंतरही तो कोणतीही काळजी न घेता भक्तांच्या संपर्कात येत राहिला. 4 जून रोजी हा बाबा मरण पावला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या भक्तांच्या ‘कोरोना’ चाचण्यांचे अहवालही पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.

हेही वाचा : माझ्या शरीरावर ‘कोरोना’ संशोधन करा, सोलापुरात पॅरोलवरील कैद्याचे पत्र

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जिल्हा प्रशासनाने इतर 29 भोंदूबाबांनाही क्वारंटाईन केले आहे. वारंवार जागरुकता पसरवूनही भक्त अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने हे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.

मंगळवारी रात्री रतलाम शहरातील 24 जणांचे अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले. 24 पैकी 13 जण भोंदूबाबांच्या संपर्कात आलेल्या नयापुरा भागातील होते. या वृत्तानंतर नयापुरा भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

विशेष म्हणजे मध्य प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. बुधवारी 200 नवीन रुग्ण सापडले आहेत. राजधानी भोपाळमध्येही बुधवारी 85 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर इंदोरमध्ये कोरोनाचे 51 रुग्ण मिळाले आहेत.

(Baba Kissing Hands Claiming Corona Treatment Dies in Ratlam Madhya Pradesh)

Published On - 4:50 pm, Thu, 11 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI