इस्लामनुसार प्रार्थना करा, शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, बारामतीतील कोरोनाबाधित कुटुंबाचा आदर्श

इस्लामनुसार प्रार्थना करा, शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, बारामतीतील कोरोनाबाधित कुटुंबाचा आदर्श

‘कोरोना’ची लागण झालेल्या बारामतीमधील भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. (Baramati Corona Patient Last rites)

अनिश बेंद्रे

|

Apr 09, 2020 | 5:23 PM

बारामती : बारामतीमधील ‘कोरोना’बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर मुलाने नियमानुसार वडिलांचे अंत्यविधी करण्यास परवानगी दिली आहे. इस्लाम धर्मानुसार त्यांच्यासाठी प्रार्थना करुन शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, असा आदर्श निर्णय कोरोनाबाधित कुटुंबाने घेतला. मुलगा-सुनेसह नातींनाही ‘कोरोना’ झाल्यामुळे कोणीही त्यांना अंतिम निरोप देताना उपस्थित राहू शकणार नाही. (Baramati Corona Patient Last rites)

‘कोरोना’ची लागण झालेल्या बारामतीमधील भाजी विक्रेत्या ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या रुग्णाच्या मुलगा-सून आणि दोघी नातींनाही ‘कोरोना’ झाला आहे. ‘कोरोना’मुळे बारामतीत गेलेला हा पहिलाच बळी आहे.

मित्र परिवार, नातेवाईकांनीही पित्यासाठी घरात थांबून प्रार्थना करण्याचं आवाहन तरुणाने केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून संबंधित कुटुंबाने परवानगी दिली. अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनी कुटुंबाचं प्रबोधन केलं होतं.

बारामती तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण असून त्यापैकी पाच जण एकाच कुटुंबातील होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. पुण्यात कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला असून यातील एक बारामतीचा 1 आहे.

दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील समर्थनगर भागातील भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. संबंधित भाजी विक्रेता गेल्या चार महिन्यांपासून पॅरालिसीसमुळे घरातच होते. दोन दिवसांपूर्वी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आजूबाजूचा 5 किमीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला होता. (Baramati Corona Patient Last rites)

हे वाचा : ‘कोरोना’मुळे बारामतीत पहिला बळी, भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

त्यांच्यापाठोपाठ मुलगा, सून आणि दोन नातींनाही कोरोनाची लागण झाली. परवा मुलगा-सुनेचे अहवाल आले होते, तर काल एक आणि आठ वर्षांच्या नातीलाही ‘कोरोना’ झाल्याचं समजलं होतं. मात्र उपचार सुरु असताना ज्येष्ठ नागरिकाचं निधन झालं.

याआधी बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्या रुग्णाशी संबंधित व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र भाजी विक्रेत्या कुटुंबाला कोरोना झाल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालं. आता एकाचा मृत्यू झाल्याने धाकधूक वाढली आहे.

बारामतीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीत भिलवाडा पँटर्न राबवण्याचे जाहीर केले आहे. सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची  बैठक घेऊन त्यात याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बारामतीसह राज्यात कोरोना हातपाय पसरत असतानाही नागरिकांना गांभीर्य समजत नसल्याने अजित पवार संतप्त झाले होते.

(Baramati Corona Patient Last rites)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें