प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन

गेल्या वर्षीपासून इरफान खान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरच्या श्वास घेतला. (Bollywood Actor Irrfan Khan Passed away)

प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन

मुंबई : लाईफ ऑफ पाय, बिल्लू, हिंदी मिडीयम, पिकू, पानसिंग तोमर अशा एकापेक्षा एक चित्रपटात दर्जेदार अभिनयाने आपल्या भूमिकांना वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने अखेरच्या श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने काल त्याला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच उपचारादरम्यान इरफानची प्राणज्योत मालवली.  दोन वर्षांपासून तो न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता. (Bollywood Actor Irrfan Khan Passed away)

इरफान खानच्या पार्थिवावर वर्सोवामधील कब्रस्तानात दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. फक्त 20 जणांना कब्रस्तानमध्ये जाण्यास परवानगी होती. या परिसरात पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं.

तीनच दिवसांपूर्वी इरफान खानच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. इरफान त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नव्हता. त्यातच इरफानच्या निधनाची चटका लावणारी बातमी समोर आली आहे.

मार्च 2018 मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती. ‘आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून असंच काहीसं घडत आहे. मला न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. मात्र, आजूबाजूच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे’ असं ट्विट त्याने त्यावेळी केलं होतं.

आजारपणानंतर इरफान पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा प्रदर्शितही झाला, मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा उतरवण्यात आला.

इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानमध्ये झाला होता.  गेल्या तीन दशकात त्याने अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं होतं.

‘चाणक्य’ या मालिकेद्वारे इरफानने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर चंद्रकांता, तसेच ‘द ग्रेट मराठा’ या मालिकांमध्ये त्याने भूमिका केली होती. ‘सलाम बॉम्बे’ हा त्याचा पहिला सिनेमा. त्यानंतर हासिल, मकबूल, चरस, बिल्लू, लंचबॉक्स, तलवार, लाईफ इन अ मेट्रो, पिकू, गुंडे, हैदर, सात खून माफ, पानसिंग तोमर, मदारी, हिंदी मीडियम, अंग्रेजी मीडियम असे त्याचे असंख्य सिनेमा गाजले आहेत. लाईफ ऑफ पाय, स्लमडॉग मिलिनिअर, ज्युरासिक पार्क 2, द अमेझिंग स्पायडरमॅन, द वॉरियर, द नेमसेक अशा हॉलिवूडपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

2011 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2013 मध्ये पानसिंग तोमर चित्रपटातील भूमिकेसाठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. (Bollywood Actor Irrfan Khan Passed away)

Published On - 12:10 pm, Wed, 29 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI