…मोदींना भाजपातून काढण्याचा निर्णय झाला होता, पण…मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट!
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोध्रा हत्याकांडाच्या काळात नरेंद्र मोदी यांना भाजपातून काढून टाकण्याचा निर्णय झाला होता, असं खळबळजनक विधान खैरे यांनी केलंय.

Chandrakant Khaire : खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या याच पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आरोप प्रत्यारोप, टीकेच्या फैरी झडत आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने अनेक नेते जुने संदर्भ उकरून काढत आहेत. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोध्रा हत्याकांडाच्या काळात नरेंद्र मोदी यांना भाजपातून काढून टाकण्याचा निर्णय झाला होता, असं खळबळजनक विधान खैरे यांनी केलंय.
मला मोदी म्हणाले की…
ज्यावेळी गोधरा हत्याकांड झालं त्यावेळेसची घटना मला माहीत आहे. लोकसभेत खूप हंगामा झाला होता. त्यानंतर मोदी यांना भाजपामधून काढण्याचा निर्णय झाला होता. शिवसेनाप्रमुखांनी मला अहमदाबादला पाठवलं होतं. त्यावेळी मी मोदी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. तसेच शिवसेना तुमच्यासोबत आहे. तसेच त्यावेळी मला मोदी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे माझ्यासोबत आहेत. पण माझ्याच पक्षातील लोक मला पक्षातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी आठवणही खैरे यांनी सांगितली.
शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं आणि…
तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोदी यांना भाजपातून काढण्यात आलं नाही, असंही खैरे यांनी सांगितलं. अटलजींना थांबावं लागलं आणि त्यांना पक्षातून काढलं नाही असं म्हणत मोदी यांना पक्षातून काढलं असतं तर ते पंतप्रधान झाले असते का? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना वाचवलं आणि मदत केली. परंतु दुःख असं होतं की यांना इतकं वाचवलं असताना शिवसेना फोडण्याचं काम या लोकांनी केलं, अशा भावनाही खैरे यांनी व्यक्त केल्या.
आमचा भाजपावर राग…
गोध्रा हत्याकांडावेळी मी तिथे जाऊन आलो. त्यांच्या घरी पण गेलो होतो. आमच्या समोर येऊन बॉम्ब पडला होता. मला पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. परंतु आम्ही घाबरलो नाही. मला याचंच दुःख होत आहे की, तुम्ही बंडखोरांना बरोबर घेत आहात. त्यांच्याबरोबर राहून मूळ शिवसेना फोडत आहात. हे बिलकुल पटलं नाही. म्हणून आमचा भाजपावर राग आहे की त्यांनी शिवसेना फोडली, अशी भूमिकाही खैरे यांनी स्पष्ट केली. ज्या शिवसेनेचे बोट पकडून तुम्ही सत्तेत आले बाळासाहेबांची तीच अभेद्य शिवसेना तुम्ही फोडली. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने फोडाफोडी केली, ते आम्हाला पटलं नाही, असंही खैरे यांनी स्पष्ट केलं.