राज्यात ओला दुष्काळ, पण औरंगाबादचा शिल्लेगाव प्रकल्प भरलाच नाही, 29 वर्षांपासून काठोकाठ भरण्याची प्रतीक्षाच!

राज्यात ओला दुष्काळ, पण औरंगाबादचा शिल्लेगाव प्रकल्प भरलाच नाही, 29 वर्षांपासून काठोकाठ भरण्याची प्रतीक्षाच!
यंदाच्या अतिवृष्टीतही प्रकल्प 66% भरला आहे.

औरंगाबाद: राज्यात सर्वत्र ओला दुष्काळ पडला आहे. नद्या-नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण जायकवाडीदेखील(Jayakwadi dam) पूर्ण भरलं आहे. मात्र औरंगबादमधील एक प्रकल्प अजूनही काठोकाठ भरण्याच्या प्रतीक्षेत आहे. लासूरमधील शिल्लेगाव बृहत् लघु प्रकल्प (Shillegaon) यंदाच्या ऐतिहासिक अतिवृष्टीनंतरही फक्त 66 टक्केच भरला आहे. त्यामुळे हा प्रकल्प भरण्यासाठी आणखी किती पाऊस पडावा लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

शिल्लेगावचा प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती

शिल्लेगाव परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी 1992 मध्ये शिल्लेगाव बृहत् लघु प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे सहा गावातील 905 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. हा प्रकल्प उभारण्यासाठी शिरेगाव व देवळी शिवारातील एक हजार हेक्टर जमीन व गाव शिवार संपादित करण्यात आले होते. येथे मोठा जलप्रकल्प होणार आणि आपला काळ बदलणार असे स्वप्न या भागातील नागरिकांना त्यावेळी पडू लागली होती. मात्र नागरिकांचे हे स्वप्न कधीही पूर्णत्वास गेले नाही. प्रकल्प अस्तित्वात आला पण एवढ्या मोठ्या प्रकल्पातून काहीच फायदा होत नाही. हा प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती पोसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

प्रकल्पाची जागा चुकली

मागील 29 वर्षांपासून हा प्रकल्प एकदाही पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. तर मागील नऊ वर्षांपासून पाणीसाठा शून्य टक्क्यांच्या पुढे गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी रंगवलेली स्वप्ने तशीच राहिली. यंदाचा पाऊस हा अनेक दशकांमधील विक्रमी पाऊस होता. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणं, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, कोल्हापुरी सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्याला मात्र शिल्लेगाव बृहत लघु प्रकल्प अपवाद ठरला आहे. या प्रकल्पात 66 टक्के पाणीसाठा आहे. त्यापुढे पाणी आलेलेच नाही. वर्षानुवर्षांपासून एकदाही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे कोणी अशिक्षित माणूसही सांगतो की, सरकारने या प्रकल्पासाठीची जागा चुकीची निवडली आहे.

दोन किमीवर शिवना दुथडी भरून वाहतेय

राजकीय दबावाखाली प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे हा प्रकल्प लाभ क्षेत्रातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. प्रकल्पापासून पश्चिमेकडे दोन किलोमीटर अंतरावर शिवना नदी गेल्या दीड महिन्यापासून दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनाला हे पाणी शिल्लेगाव प्रकल्पात आणण्यात यश आले असते तर यंदा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असता. शिवाय शेतकऱ्यांसाठी पाण्याची मोठी सोय झाली असती. परंतु यंदाही हे भाग्य शेतकऱ्यांच्या नशीबी आले नाही. आता प्रकल्प भरण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पहायची, असा प्रश्न शेतकरी विचार आहेत.

मागील 9 वर्षे शून्य टक्के साठा

2009 मध्ये या प्रल्पात 18 टक्के साठा झाला. 2010 मध्ये 70 टक्के साठा झाला. 2011 मध्ये २९ टक्के एवढा हा प्रकल्प भरला. मात्र त्यानंतर सलग नऊ वर्षे हा प्रकल्प शून्य टक्के भरला होता. यंदाच्या अतिवृष्टीमुळे हा प्रकल्प प्रथमच 66 टक्के भरला असून आता तो शंभर टक्के कधी भरेल या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहेत.

इतर बातम्या-

कोण आहेत यास्मिन वानखेडे ज्यांना नवाब मलिकांनी लेडी डॉन म्हटलंय? काय आहे त्यांची संपूर्ण प्रकरणात भूमिका?

डॉ. शिंदे खून: पत्नीच्या जबाबात विसंगती, असंख्य कॉल रेकॉर्ड्स पिंजून काढले, क्लू अजून दूरच…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI