प्रताप सरनाईकांना अडकवलं जातंय; कारवाई चुकीची हे आता जनतेलाही कळून चुकलंय : जयंत पाटील

प्रताप सरनाईक यांनी राजकीय फायदा घेऊन काम केलेले कुठे दिसत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil Pratap Sarnaik)

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 20:54 PM, 26 Nov 2020
प्रताप सरनाईकांना अडकवलं जातंय; कारवाई चुकीची हे आता जनतेलाही कळून चुकलंय : जयंत पाटील

सांगली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीने (ED) कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. “विरोधी पक्षाच्या लोकांवर, आमदारांवर कारवाई करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक चालू आहे, असं जनतेच मत होऊ लागले आहे.” असे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. तसेच, सरनाईक यांनी राजकीय फायदा घेऊन काम केलेले कुठे दिसत नाही, असे म्हणत प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची त्यांनी पाठराखण केली. ते सांगलीत ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Jayant Patil commented on action of ED against Pratap Sarnaik)

“प्रताप सरनाईक यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. ठाणे शहरात व्यवसाय करुन ते मोठे झाले आहेत. त्यांनी कोणताही राजकीय फायदा घेऊन काम केलेले दिसत नाही. तरीही सरनाईक यांच्यावर कारवाई झाली,” असे, जयंत पाटील म्हणाले. तसेच, “सत्य लवकरच बाहेर येईल आणि जनतेच्या खरं काय ते लक्षात येईल, असेही पाटील म्हणाले.

किरीट सोमय्या यांची टीका 

प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीने (ED) कारवाईचा बडगा उगारल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले.  ‘ईडी’च्या कारवाईतून कोणीही वाचणार नाही. फक्त प्रताप सरनाईकच नव्हे तर ठाकरे सरकारने वाचवलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

‘ईडी’च्या सगळ्या तपासातून कोणीही सुटणार नाही. या व्यवहारातून ज्यांना फायदा झाला आहे, त्या सर्वांवर कारवाई होईल. आज ना उद्या सर्व गोष्टी समोर येतीलच. मात्र, ठाकरे सरकार या सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. मुंबईबाहेरुन आल्यामुळे सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे.


संबंधित बातम्या :

सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी; प्रताप सरनाईक यांना झटका

(Jayant Patil commented on action of ED against Pratap Sarnaik)