घराजवळ खेळताना बिबट्याची झडप, नगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील मढी जवळील काकडदरा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू झाला

घराजवळ खेळताना बिबट्याची झडप, नगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील मढी जवळील काकडदरा परिसरात ही घटना घडली. घराजवळ खेळणाऱ्या चिमुकलीवर रात्रीच्या अंधारात बिबट्याने हल्ला केला होता. (Leopard Attack on Ahmednagar Girl)

चिमुकली रात्रीच्या वेळी घरातील दरवाजाजवळ खेळत होती. त्याचवेळी बिबट्या काकडदारातील नागरी वस्तीत घुसला. चिमुकली खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना काही समजण्याच्या अगोदरच बिबट्या चिमुकलीला घेऊन पुन्हा जंगलात निघून गेला.

चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याचं वृत्त काकडदारा वस्तीत वाऱ्यासारखं पसरलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, वस्तीवर अंधार आणि जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे चिमुकलीचा शोध घेताना अडथळे आले.

वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल

काकडदरा परिसरात घडलेल्या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक काकडदरा येथे सकाळी दाखल झाले, त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी चिमुकली मृतावस्थेत आढळून आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

नाशिकमधील घटनेची पुनरावृत्ती

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. परमोरी शिवारात महिला टोमॅटोच्या शेतात काम करीत होत्या. शेजारीच लहान मुलेही खेळत होते. शेजारील ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालकावर हल्ला करत त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले होते.

संबंधित बातम्या :

घराच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीवर बिबट्याची झडप, आजीच्या हाताला झटका देऊन हल्ला

(Leopard Attack on Ahmednagar Girl)

Published On - 6:47 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI