आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. MLA Geeta Jain bogus audio clip

आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक
navghar police station

ठाणे : मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका महिला पदाधिकारीला अटक केली आहे. नकली ऑडिओ क्लिपबाबत गीता जैन यांनी 17 जुलैला नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करुन भाजप पदाधिकारी आरोपी रंजू झा या महिलेला अटक करुन कोर्टात हजर केलं. (MLA Geeta Jain bogus audio clip)

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्र सरकारच्या नावे कोरोनाबाबत चुकीची माहिती दिली जाऊन, पैशाबाबतचा संवाद आहे. केंद्र सरकार प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानुसार, महापालिकांना दीड लाख रुपये देत असल्याचा चुकीचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. खासगी डॉक्टर, प्रयोगशाळा, आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्यासाठी लक्ष ठेवत आहे, असंही या क्लिपमध्ये नमूद आहे.

इतकंच नाही तर साधा सर्दी-ताप असला तरी जबरदस्तीने कोरोना रुग्ण म्हणून अॅडमिट केलं जात असल्याचंही या क्लिपमध्ये म्हटलं आहे. दीड लाख रुपये महापालिकेला मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाला घरी पाठवले जाते, त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे, असा दावा करुन तपासणी बंद करा, असं आवाहन या क्लिपमध्ये केलं आहे. ही क्लिप आमदार गीता जैन यांचा नकली आवाज काढून व्हायरल करण्यात आली आहे.

कोण आहे आरोपी रंजू झा?

पोलिसांनी याप्रकरणी रंजू झा या महिलेला अटक केली आहे. रंजू झा ही भाजपची उत्तर भारतीय महिला मोर्चाची मीरा भाईंदर उपाध्यक्ष आहे. पोलीस कारवाईनंतरही आपल्याला अटक झाली नाही, असा दावा रंजू झाने केला होता. मात्र पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने तिला जामीन मंजूर केल्याचं समोर आलं आहे.

आमदार गीता जैन यांची प्रतिक्रिया

दरम्यान, याप्रकरणी आमदार गीता जैन यांनी बनावट क्लिप करुन असं कृत्य करणाचा प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलं. आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे असं त्या म्हणाल्या.

(MLA Geeta Jain bogus audio clip)

संबंधित बातम्या 

MLA corona | मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण   

मिरा भाईंदरच्या ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन 

Published On - 11:58 am, Sat, 25 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI