नागपुरात 41 लाखांची ऑनलाईन फसवणूक, चार नायजेरियनसह एका भारतीयाला अटक

सैनिक दलातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या महिलेसोबत या टोळीतील एकाने फेसबुकच्या माध्यमातून ओळख केली

नागपुरात 41 लाखांची ऑनलाईन फसवणूक, चार नायजेरियनसह एका भारतीयाला अटक
Nupur Chilkulwar

|

Oct 13, 2020 | 10:50 PM

नागपूर : नागपूर सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी चार नायजेरियन आरोपींसह (Nagpur Online Fraud) एका भारतीय नागरिकाला ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात दिल्ली वरुन अटक केली. तसेच, त्यांच्या बँक खात्यातून 18 लाख रुपये गोठविण्यात यश मिळवलं आहे. हे लोक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून त्यांनी अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली आहे (Nagpur Online Fraud).

सैनिक दलातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या महिलेसोबत या टोळीतील एकाने फेसबुकच्या माध्यमातून ओळख केली आणि त्यांना कॅनडामध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. सोबतच त्यांना वेगवेगळे गिफ्ट देणार असल्याचे सांगत त्यांची 41 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते. मात्र, महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

नागपूरच्या सायबर सेलने हे प्रकरण हाताळत तपासाला सुरवात केली. ज्या बँकेमार्फत पैश्यांची देवाणघेवाण झाली, ते खाते तपासून पैसे कुठे पोहचले याची माहिती घेतली. दिल्ली वरुन सगळा कारभार चालत असल्याचं पुढे आलं. त्या आधारावरुन सायबर पोलिसांनी दिल्लीला जाऊन चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर एका भारतीयाला सुद्धा अटक केली. तर यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून 18 लाख रुपये गोठविण्यात आले असून काही मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला. पोलीस आता यांचा कसून तपास करत आहे.

या टोळीने भारतीय नागरिकांना हाताशी धरुन देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्याचा तपास सुद्धा आता केला जाणार आहे. नागरिकांनी असं आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.

Nagpur Online Fraud

संबंधित बातम्या :

HATHRAS CASE | न्याय मिळेपर्य़ंत अस्थी विसर्जन नाही, पीडितेच्या कुटुंबाचा पवित्रा

पुण्यातील सराफाची दुकाने फोडणारी टोळी गजाआड; एक कोटी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलडाण्यात नग्न चोरट्याने पोलीस स्टेशनसमोरील 7 दुकानं फोडली, हजारोंचा ऐवज लंपास

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें