हँडल लॉक तोडून गाडीला आपली नंबर प्लेट, नागपुरात सराईत बाईकचोर जेरबंद

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी वाहन चोरीचा धडाका लावलेल्या अट्टल चोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय (Nagpur Police arrest Moped bike thief ).

हँडल लॉक तोडून गाडीला आपली नंबर प्लेट, नागपुरात सराईत बाईकचोर जेरबंद

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कर्ज फेडण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी वाहन चोरीचा धडाका लावलेल्या अट्टल चोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय (Nagpur Police arrest Moped bike thief ). नागपूरच्या सदर पोलिसांनी या प्रकरणी दोन मोटर सायकल चोरांना अटक केली. महत्वाचं म्हणजे या चोरट्यांनी आपली चोरी पकडली जात नसल्याचं लक्षात घेऊन चोरीचा सपाटाच लावला. मात्र, चोरीच्या एकसारख्या घटनांचा माग काढत अखेर नागपूर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 10 पेक्षा अधिक मोपेड गाडी जप्त करण्यात आल्या आहेत.

नागपूरच्या सदर परिसरात वाहन चोरी होण्याचं प्रमाण वाढल्याने पोलिसांनी या घटनांवर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर पोलिसांना दोन जणांवर संशय आला. पोलिसांनी सापळा रचून या दोन संशयित आरोपींना अटक केली. चौकसीत त्या आरोपींनी वाहनांच्या चोरीची मोहीमच सुरु केल्याचं पुढे आलं. वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत त्यांनी वाहनांची चोरी केली. हे चोर वाहन विकायचे किंवा गहाण ठेऊन त्या बदल्यात पैसे मिळवायचे. त्यांनी अनेक ठिकाणी कर्ज घेऊन ठेवलं होतं. ते फेडण्यासाठी आणि ऐशोआरामात जीवन जगता यावं, पैशांची उधळपट्टी करता यावी यासाठी मोपेड वाहनांची चोरी करायचे, असं पोलिसांच्या तपासात पुढे आलं.

संबंधित चोरांची वाहन चोरीची पद्धतही वेगळी होती. ते पाहणी करुन प्रथम गाडीचे हँडल लॉक तोडायचे आणि नंतर त्या वाहनाला आपल्या गाडीची नंबर प्लेट लावायचं. यानंतर ते त्या गाडीची किल्ली बनवून विकायचे किंवा गहाण ठेवायचे. त्यामुळे त्यांच्यावर कोणाला संशयही येत नव्हता. मात्र, नागपूर पोलिसांनी नजर ठेऊन या चोरांना अटक केली. यामुळे नागपूरमधील अनेकांच्या चोरीला गेलेल्या गाड्यांचा शोध लागणार आहे. आतापर्यंत 10 पेक्षा अधिक गाड्या जप्त करण्यात यश आलं आहे. आणखी गाड्या कोठे आहेत याचाही शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश बनसोड यांनी दिली.

हेही वाचा :

साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा खून करुन जंगलात फेकलं, एक जण ताब्यात

साताऱ्यात खवले मांजराची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

पत्नीला माहेरी पाठवल्याचा राग, पुणे रेल्वे पोलिसात असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने हल्ला

Nagpur Police arrest Moped bike thief

Published On - 12:45 pm, Tue, 1 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI