आमचा पक्ष सत्तेत आल्यास नितीश कुमारांना तुरुंगात टाकू- चिराग पासवान

बिहारला 'नितीश सरकार मुक्त' करण्यासाठी जनतेले आम्हाला मतदान करावे. | Chirag Paswan

आमचा पक्ष सत्तेत आल्यास नितीश कुमारांना तुरुंगात टाकू- चिराग पासवान

पाटणा: बिहारमध्ये आमची सत्ता आल्यास मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तुरुंगात टाकू, असे खळबळजनक वक्तव्य लोकजनशक्ती पार्टीचे (LJP) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी केले आहे. बिहारमध्ये लागू करण्यात आलेली दारुबंदी सपशेल अपयशी ठरली. राज्यभरात अवैध दारुविक्री सर्रासपणे सुरु आहे. त्यासाठी नितीश कुमार यांना लाच मिळते, असा आरोप चिराग पासवान यांनी केला. (Chirag Paswan attack on JDU Nitish Kumar)

येत्या 28 तारखेला बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बक्सर जिल्ह्यातील सभेत चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  चिराग पासवान यांनी बिहारला ‘नितीश सरकार मुक्त’ करण्यासाठी जनतेले आम्हाला मतदान करावे, असे आवाहन केले. बिहार फर्स्ट हे आमच्या सरकारचे धोरण असेल. लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार नसलेल्या जागांवर भाजपला मतदान करा. जेणेकरून आगामी काळात सत्तेत येणारे सरकार ‘नितीश मुक्त’ असेल, असे चिराग पासवान यांनी म्हटले.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाशी युती केली आहे. परंतु, नितीश कुमार यांचे नेतृत्त्व मान्य नसल्यामुळे चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी या आघाडीतून बाहेर पडली होती. आपला नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा आहे. मी पंतप्रधान मोदींचा हनुमान आहे, असे वक्तव्य चिराग पासवान यांनी केले होते. तसेच चिराग पासवान यांनी केवळ नितीश कुमार यांच्या पक्षाविरोधातच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लोकजनशक्ती पार्टी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करेल, असे चिराग पासवान यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यावेळी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला कमी जागा मिळाल्यास भाजप काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संबंधित बातम्या:

नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर

Bihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी वाटाघाटी

शिवसेनेला ठेच, ‘लोजप’ शहाणा, चिराग पासवान यांचा भाजपला धक्का

(Chirag Paswan attack on JDU Nitish Kumar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI