भरउन्हात डोक्यावर टोपलं, दुष्काळ दौऱ्यात पंकजा मुंडेंचं श्रमदान

भरउन्हात डोक्यावर टोपलं, दुष्काळ दौऱ्यात पंकजा मुंडेंचं श्रमदान

बीड : विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे सध्या दुष्काळ दौरे सुरु आहेत. दुष्काळ दौऱ्यानिमित्त चारा छावण्यांना भेट आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याबरोबरच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड तालुक्यातील तळेगाव येथे भर उन्हात श्रमदान केलं. संध्याकाळी हिंगणी बु येथे वॉटरकप स्पर्धेतील गावात जाऊन ग्रामस्थांसोबत श्रमदान केलं. ही दोन्ही गावे पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत उतरली आहेत. या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थ एकजुटीने दुष्काळ निवारणासाठी श्रमदान करत आहेत. पंकजा मुंडेंनीही या कामाला हातभार लावला.

पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दुष्काळ दौरा करताना चारा छावणी भेट, शेतकऱ्यांशी संवाद, टंचाईग्रस्त गावांना भेट दिली. त्यांनी तांबा राजूरी, आवळवाडी, रायमोहा, खोकरमोहा, तळेगांव, आहेर वडगाव, मांजरसुंबा, चौसाळा या ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. छावणीवर आणि बांधावर जाऊन तेथील परिस्थितीची आणि छावण्यावर असलेल्या सुविधांची त्यांनी पाहणी केली. शिवाय झाडाखाली बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांवर काम करत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ येतो. हा जिल्हा सर्वाधिक विमा मिळविणारा जिल्हा असला तरी ही बाब आनंदाची नाही. सध्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जादा टँकर देणे हाच पर्याय आहे. पण कायमस्वरूपी टंचाईवर मात करण्यासाठी 32 हजार कोटींचा वॉटरग्रीड प्रकल्प आणि कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचा भागाला फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील सात वर्षात जिल्ह्याला बंद पाईपमधून पाणीपुरवठा होणार असल्याने पाऊस नसला तरी जिल्ह्याला पाणी मिळेल. भविष्यात सर्वाधिक विमा घेणारा जिल्हा अशा पुरस्काराऐवजी उपाय योजना करून सुजलाम् सुफलाम् जिल्हा असा पुरस्कार आपल्याला मिळवायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

चारा छावणीला भेट दिल्यानंतर पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शिवाय शेतकऱ्यांनी आणलेल्या शिदोरीचा त्यांच्यासोबत बसून आस्वाद घेतला. शेतकऱ्यांनी चारा छावण्यांवर राजकारण चालत असल्याचीही तक्रार केली. राजकारण करून कोणी विनाकारण छावणी चालकाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन करणार नाही, माझ्या माणसांच्या मागे मी खंबीरपणे उभी आहे, असं त्यांनी सांगितलं.

Published On - 10:11 pm, Fri, 10 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI