BLOG | वो चमेली कें फूल…

आज इरफानचं जाणं फार धक्का लावून नाही गेलं. कारण शेवटचं त्याच्याशी बोलणं झालं साधारण दीड वर्षांपूर्वी तेव्हाच तो म्हणाला, “प्रभाजी चमेली की चादर चढाने का वक्त नजदीक आ रहा हैं..”

  • Updated On - 2:43 pm, Wed, 29 April 20
BLOG |  वो चमेली कें फूल...

इरफान खान आज गेला.. गेल्या कित्येक दिवसांपासून तो जाणार अशा बातम्या (Prabha Kudkes blog on Irrfan Khan) कानावर आदळत होत्या. साधारण 15 वर्षांपूर्वी सकाळ वर्तमानपत्रात असताना इरफान खानची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. एका नामांकित पबमध्ये भेट झाली आणि खूप वेळ गप्पा झाल्या. बाजूला वाजत असलेल्या मोठ्या संगीताच्या आवाजातही इरफानचा खणखणीत आवाज कानावर येत होता. इरफानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली होती हे जाणून घेण्यासाठी मी त्याला भेटले होते.(Prabha Kudkes blog on Irrfan Khan)

मुलाखतीच्या दरम्यान इरफानने त्याच्या लहानपणीची एक गोष्ट सांगितली. इरफानच्या आजीच्या अंगणात एक चमेलीचा वेल होता. चमेलीच्या फुलांचा सुगंध हा त्यांच्या अंगणात दरवळत असायचा. इरफान त्यावेळी बोलताना मला म्हणाला, त्या चमेलीच्या फुलांनी मला वेड लागायचं. ती फुलं सकाळी कधी उमलतात हे पाहण्यासाठी मी लवकर उठायचो. तो सुगंध मनात साठवून ठेवायचो आणि माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्या चमेलीच्या वेलासोबत माझं एक नातं तयार झालं होतं असं त्याने सांगितलं.

इरफानचं वेगळेपण हे तेव्हाच दिसून आलं होतं. काही माणसं ही खरोखर वेगळी असतात स्टारडमपेक्षा या माणसांकडे मन असतं हे त्यावेळी इरफानशी बोलताना पदोपदी जाणवलं. त्यानंतर इरफान वरचेवर भेटला.. कैसे हो प्रभाजी.. असं म्हणत नंतर पुढचं वाक्य म्हणायचं आपको याद हैं ना चमेली के फुल.. मी म्हणायचे यस सर…

इरफान खानने त्या मुलाखतीत एक इच्छा व्यक्त केली होती. की आमच्या धर्मात आमच्यावर फुलांची चादर चढवली जाते. मी जेव्हा या जगातून जाईन तेव्हा हा चमेलीचा सुगंध माझ्यासोबत असावा असं मला वाटतं. माझ्या अंगावर मी गेल्यानंतर चादर चढवली जाईल तर ती चमेलीची असावी असं मला वाटतं.

आज इरफानचं जाणं फार धक्का लावून नाही गेलं. कारण शेवटचं त्याच्याशी बोलणं झालं साधारण दीड वर्षांपूर्वी तेव्हाच तो म्हणाला, “प्रभाजी चमेली की चादर चढाने का वक्त नजदीक आ रहा हैं..”

आज या टाळेबंदीच्या काळात मिळाली असेल का त्याला ती चमेली.. म्हणून जीव कासावीस झालाय… तो गेलाय त्याचं फार वाईट वाटत नाहीए… तो सुटलाय.. पण चमेलीचं काय…

मिळाली असेल का त्याला ती चमेली… तो चमेलीचा सुगंध… ???