राज्यमंत्री भरणेंची 100 रुपयांची पावती, हर्षवर्धन पाटलांच्या सुपुत्राकडून 500 रुपये पावतीने उत्तर

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी भरणेंच्या शंभराच्या पावतीला पाचशेच्या पावतीने टक्कर दिली.

राज्यमंत्री भरणेंची 100 रुपयांची पावती, हर्षवर्धन पाटलांच्या सुपुत्राकडून 500 रुपये पावतीने उत्तर

इंदापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातल्या जंक्शन येथे एका दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना मास्क खाली घसरल्यामुळे आपणाकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे कारण दाखवत स्वतःहून लासुर्णे ग्रामपंचायतकडे 100 रुपये दंडात्मक रक्कम भरली होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी भरणेंच्या 100 च्या पावतीला 500 च्या पावतीने टक्कर दिली. (Rajwardhan patil paid Fine RS 500 for not wearing mask)

आज 03 नोव्हेंबर रोजी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या बावडा या मूळगावी कार्यक्रमानिमित्त गेलो असता माझाही मास्क चेहऱ्यावरुन खाली घसरल्याचे कारण दाखवत बावडा ग्रामपंचायतीकडे 500 रुपये दंडात्मक आकारणी रक्कम भरली.

राज्यमंत्री भरणे यांनी 100 रुपयाच्या दंडाची रक्कम भरण्याचा प्रसंग म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याचा आरोप इंदापूर भाजपच्या तालुकाध्यक्षांनी केला होता. त्यानंतर आज राज्यमंत्र्यांच्या 100 रुपयांच्या दंडाच्या पावतीला राजवर्धन पाटील यांनी 500 रुपयाच्या पावतीने उत्तर दिलं आहे.

“सामान्य जनता आणि राज्यमंत्री यांच्यात दंडासंदर्भात दुजाभाव असल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईतून दिसून आले. याचा अर्थ सामान्य जनता आणि आपण कसे वेगळे आहोत हे दाखवून दिले. विरोधाला विरोध नाही मात्र स्वत: मंत्र्यांनीचा कायदा मोडला तर तो कायदा जनतेला कसा काय लागू होतो? याचे उत्तर प्रशासनाने व कायदा मोडणाराने द्यावे. मात्र मी जनतेसोबत असून सर्वांना असणारे नियम सारखेच आहेत आणि ते सर्वांनी पाळले पाहिजेत हेच मी यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे”, असं स्पष्टीकरण राजवर्धन पाटील यांनी दंड भरल्यानंतर दिलं.

विनामास्क असल्याने दत्तात्रेय भरणेंना 100 रुपये दंड

दोन दिवसांपूर्वी भाषण सुरु असताना अचानक मास्क सटकल्याने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 100 रुपये दंड दिला. हा दंड त्यांनी स्वत:हून दिला. यावेळी त्यांनी इतरांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी ते इंदापुरात आले होते.

दोघांनाही आकारला गेलेल्या दंडाच्या पावत्या त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. खरं तर दंड भरणे, दंड आकाराला जाणे, हे अपराध्याला शिक्षा म्हणून योजलेला उपाय आहे. त्याची वाच्यता समाजामध्ये करणे देखील अपराधीपणाचे लक्षण मानले जाते. मात्र इंदापुरातील राजकारण्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना परिस्थितीचं गांभीर्य उरलंय की नाही? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये ऐकायला मिळतीये.

(Rajwardhan patil paid Fine RS 500 for not wearing mask)

संबंधित बातम्या

विनामास्क असल्याने दत्तात्रेय भरणेंना 100 रुपये दंड; नियमांचे पालन झालेच पाहिजे : भरणे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI