मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात?, आरक्षणावरुन संभाजी भिडे यांची पलटी
भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत, आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणावरुन आता संभाजी भिडे गुरुजी यांनी पलटी खाल्ली आहे. याआधी संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे मागे भेट घेतली होती. त्यावेळी या आंदोलनाचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळण्यातच व्हायला हवा असे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले होते. मराठा आरक्षणाला पाठींबा देणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांनी अचानक मराठ्यांनो आरक्षणाचे कुठे घेऊन बसलाय, मराठा म्हणजे वाघ आणि सिंह ? सिंहाने जंगल सांभाळायचे असते.मराठ्यांना उभा देश चालवायाचा आहे. हे आरक्षणाचे कुठे घेऊन बसलात अशी विधाने संभाजी भिडे गुरुजी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली काही वर्षे मराठा समाज आंदोलन करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. या उपोषणानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांना आश्वासन देत त्यांचे उपोषण समाप्त केले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. यानंतर सगेसोयरे यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळायला हवे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला होता. परंतू ओबीसी नेत्यांनी ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
भिडेंपासून मराठे दूर जातील
संभाजी भिडे गुरुजी यांनी आज अचानक मराठा आरक्षणावरुन पलटी मारली. ते म्हणाले की मराठ्यांनो आरक्षणाचे कुठे घेऊन बसलात? मराठा म्हणजे वाघ आणि सिंह आहेत. सिंहानी जंगल सांभाळचे असते. तसेच मराठ्यांना हा देश सांभाळायचा आहे. आरक्षण काय तु्म्ही घेऊन बसलाय असेही संभाजी भिडे म्हणाले आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी हे संभाजी भिडे यांच्या तोंडातून देवेंद्र फडणवीस बोलत आहे. यात भिडे गुरुजींचा यांना काहीही दोष देण्यात काही अर्थ नाही. संभाजी भिडे यांच्याकडे जी गर्दी आहे ती सर्व मराठे तरुण आहेत. आता संभाजी भिडेंकडे कोणताही मराठा जाणार नाही. देवेंद्र फडणवीस स्वत:ला पण राजकारणातून संपवत आहेत आणि आता संभाजी भिडे यांनाही संपवायला निघाले आहेत अशीही टिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
25 ऑगस्ट रोजी सांगली बंद
बांगलादेशात सत्तापालट झाला आहे. तेथे हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेध करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा करण्यासाठी संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदत बोलविण्यात आली होती. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती संभाजी भिडे यांनी दिली आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.
