पैठण नगरीतले संतपीठ चालू शैक्षणिक वर्षातच सुरु होणार, उच्च शिक्षण मंत्र्यांची ग्वाही, जाणून घ्या- कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश

पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठात तुकाराम गाथा परिचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी कीर्तन, हरीदासी कीर्तन आणि एकनाथी भागवत परिचय प्रमाण पत्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

पैठण नगरीतले संतपीठ चालू शैक्षणिक वर्षातच सुरु होणार, उच्च शिक्षण मंत्र्यांची ग्वाही, जाणून घ्या- कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश
औरंगबााद येथील बैठकीत बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण

औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून पैठण येथील संतपीठ सुरु होण्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता ते लवकरच कार्यान्वित होण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली. पैठण येथील संतपीठासंदर्भात उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्येच संतपीठ सुरु होईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हेदेखील उपस्थित होते. संतपीठाला आवश्यक तो निधी देणार असल्याचे आश्वासनही यावेळी सामंत यांनी दिले.

निधी कमी पडू देणार नाही- उदय सामंत

या बैठकीत बोलताना उदय सामंत म्हणाले,” मराठवाडा ही संतांचा इतिहास सांगणारी भूमी आहे. या भूमीत नावारुपाला येणारी संतपीठ ही संकल्पना केवळ विषयांच्या पुस्तकी व बौद्धिक शिक्षणावर भर देणारी नाही. हे समाज शास्त्राचे शिक्षापीठ न राहता समाजसेवेचे दीक्षापीठ होणार आहे. अशा संतपीठात तत्काळ विद्यादानाचे काम सुरु होणे आवश्यक आहे. त्यामुळे संतपीठाला निधीची कमतरता पडू देणार नाही.”

 

सांप्रदायिक कलांचा अभ्यास करण्याचा उद्देश

पैठण येथे हे संतपीठ उभारले जात आहे. भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे तसेच सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्टे या संतपीठामागे आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश?

पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपीठात तुकाराम गाथा परिचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी कीर्तन, हरीदासी कीर्तन आणि एकनाथी भागवत परिचय प्रमाण पत्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. बैठकीत त्यांनी संतपीठातील प्रस्तावित नवीन विभाग व अभ्यासक्रमाचे स्वरुप याविषयी माहिती दिली. विद्यापीठात संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि संगीत विभागाअंतर्गत एकूण पाच अभ्यासक्रम तूर्तास सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी 11 सप्टेंबरला भेट देणार

या बैठकीला उपस्थित असलेले विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी संतपीठात तत्काळ अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी ज्या अडचणी येतील, त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी 11 तारखेला पैठण येथील संतपीठाला भेट देऊन तेथील इमारतीची पाहणी करणार असल्याचे सांगितले.

इतर बातम्या-

तब्बल 2062 जागांसाठी शिक्षक भरती, 3902 उमेदवारांची मुलाखत, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे कोट्यावधींची ‘माया’, वैशाली झनकरांचा पाय आणखी खोलात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI