ट्विटरवर ‘बाबा का ढाबा’ ट्रेंडमध्ये; ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी लोकांची रीघ

लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

ट्विटरवर 'बाबा का ढाबा' ट्रेंडमध्ये; 'त्या' वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी लोकांची रीघ

नवी दिल्ली: सोशल मीडियावरून एकमेकांवर पातळी सोडून केली जाणारी गलिच्छ टीका किंवा आक्षेपार्ह मजकुरामुळे एकूणच या माध्यमाविषयी अलीकडच्या काळात काहीसे नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र, याच सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने झाल्यास एखाद्याचे आयुष्य कशाप्रकारे बदलू शकते, याचा प्रत्यय सध्या ट्विटरवर येत आहे. गुरुवारी सकाळपासून ट्विटरवर ‘बाबा का ढाबा’ प्रचंड ट्रेनमध्ये आहे. (Baba ka Dhaba Trend on Twitter)

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हा ढाबा आहे. कांता प्रसाद हे वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीसह हा ढाबा चालवतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लोक पूर्वीसारखे ढाब्यावर येत नसल्याने कांता प्रसाद यांच्यासमोर दैनंदिन गुजराण कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता.


एका व्यक्तीने कांता प्रसाद यांची विचारपूस केली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर एका युजरने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर करत कांता प्रसाद यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून हा व्हीडिओ प्रचंड चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटीजनी हा व्हीडिओ रिट्विट करत कांता प्रसाद यांना मदत करण्याची विनंती केली होती. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघानेही हा व्हीडिओ रिट्विट केला होता.


त्यामुळे साहजिकच हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता कांता प्रसाद यांच्या ‘बाबा का ढाबा’वर चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दिल्लीकरांची रीघ लागल्याचे चित्र आहे. याशिवाय, अनेकजण कांता प्रसाद यांना आर्थिक मदत करण्यासाठीही पुढे सरसावले आहेत. या प्रतिसादामुळे कांता प्रसाद प्रचंड भारावून गेले. संपूर्ण देश माझ्यासोबत आहे, असे मला आज वाटत आहे. प्रत्येकजण मला मदत करत असल्याची भावना कांता प्रसाद यांनी व्यक्त केली.

(Baba ka Dhaba Trend on Twitter)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI