Uttar Pradesh Flood | वाराणसीत गंगा नदीला महापूर, मृतदेहांना घरांच्या छतावर अग्नी देण्याची वेळ

दशाश्वमेध घाटावर असलेल्या शीतला माता मंदिराच्या संपूर्ण पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत.

Uttar Pradesh Flood | वाराणसीत गंगा नदीला महापूर, मृतदेहांना घरांच्या छतावर अग्नी देण्याची वेळ

लखनौ : वाराणसीत गंगा नदीचं महाविक्राळ रुप पाहायला मिळत आहे (Varanasi Ganga River Flood). गंगेच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या गंगेची पाणी पातळी 68 मीटरपर्यंत पोहोचली आहे. वाराणसीमध्ये गंगा नदीची इशारा पातळी 71.26 मीटर तर धोका पातळी 73.90 मीटर इतकी आहे (Varanasi Ganga River Flood).

दशाश्वमेध घाटावर असलेल्या शीतला माता मंदिराच्या संपूर्ण पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक छोट्या मोठ्या मंदिरांमध्येदेखील पाणी शिरलं आहे. वाराणसीतल्या स्मशानभूमींमध्ये पाणी शिरल्याने अनेक मृतदेहांना घराच्या छतावरच अग्नी देण्याची वेळ आली आहे.

वाराणसीच्या काठावर रोज 60 ते 70 मृतदेह अग्नी देण्यासाठी आणले जातात, मात्र सध्या आलेल्या भीषण पुरामुळे अनेक लोकांना वाट पाहात ताटकळत उभे राहावं लागत आहे (Varanasi Ganga River Flood).

जौनपूर, भदोही, मिर्जापूर, गाजीपूर, सोनभद्र, बलिया, गोरखपूर, पूर्वांचल अशा आसपासच्या अनेक जिल्ह्यातून लोक दशाश्वमेध घाटावर येऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असतात. मात्र नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे हे करणं अशक्य झालं आहे. त्यामुळे जिथे मोकळी जागा मिळेल तिथे अनेक मृतदेहांना अग्नी दिला जात आहे, तर अनेकांनी घरांच्या छतावरच मृतांना अग्नी देण्यास सुरूवात केली आहे.

“आम्ही आमच्या नातेवाईकाचा मृतदेह घेऊन अग्नी देण्यासाठी इथे आलो होतो. चार तास वाट पाहिल्यानंतर आमचा नंबर आला. अनेक रस्त्यांवर नदीचं पाणी आल्याने खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर इथे आल्यावर उभे राहाण्याची किंवा बसण्याचीदेखील सोय नसल्याने खूप त्रास होत आहे” अशी माहिती भदोही जिल्ह्यातून आलेल्या प्रदीप गुप्ताने दिली (Varanasi Ganga River Flood)

Published On - 4:52 pm, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI