विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन हे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

विश्व हिंदू महासभेच्या नेत्याची डोक्यात गोळ्या घालून हत्या

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे (Ranjit Bachchan Shot Dead). रंजीत बच्चन हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी रंजीतसोबत असलेल्या त्यांच्या भावावरही हल्लेखोरांनी गोळी चालवली. त्यांच्या हाताला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उत्तर प्रदेश पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे (Ranjit Bachchan Shot Dead).

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या हजरतगंज परिसरात रंजीत बच्चन मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. रंजीत बच्चन यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रंजीत बच्चन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या भावाच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी परिवर्तन चौकातील पोलीस चौकीचे प्रभारी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

थेट डोक्यात गोळ्या घातल्या

हल्लेखोरांनी रंजीत बच्चन यांच्या थेट डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यामुळे ते रंजीत यांना मारण्याच्या उद्देशानेच त्यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या हत्याकांडमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांच्या सहा टीम आणि गुन्हे शाखा आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त दिनेश सिंग यांनी दिली.

रंजीत बच्चन हे मुळचे गोरखपूरचे राहणारे होते. लखनऊमध्ये ते ओसीआर इमारतीच्या बी-ब्लॉकमध्ये राहायचे. पूर्वी ते समाजवादी पक्षासाठी सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. सध्या ते विश्व हिंदू सहासभेचे उत्तर प्रदेश अध्यक्ष होते.

समाजवादी पक्षाचा योगी सरकारवर निशाणा 

या प्रकरणी समाजवादी पक्षाने योगी सरकारवर निशाणा साधला आहे. “लखनऊमध्ये दिवसाढवळ्या हिंदू महासभेच्या अध्यक्षांची हत्या झाल्याने सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सरकार आणि पोलिसांवरील विश्वास उडाला आहे.”, असं ट्वीट सामाजवादी पक्षाकडून करण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI