‘कोरोना’धास्तीने अडवणूक, खाजगी रुग्णालयात वणवण, प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा उपचारातील दिरंगाईने बळी

यवतमाळ शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांनाही वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले.

'कोरोना'धास्तीने अडवणूक, खाजगी रुग्णालयात वणवण, प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा उपचारातील दिरंगाईने बळी

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना अन्य आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास खाजगी रुग्णालय नकार देत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशातच शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांनाही वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारास दिरंगाई झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. (Yawatmal Ayurvedic Doctor Shaikh Mustak Shaikh Khalil dies after delay in treatment)

डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांचे पुष्पकुंज सोसायटीत निवासस्थान असून त्या ठिकाणीच त्यांचे शिफा हॉस्पिटल आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कुटुंबियांना सांगितले. हॉस्पिटलमधील मदतनीस आणि कुटुंबियांसह ते नजीकच्याच क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. परंतु प्रवेशद्वारावरच त्यांची अडवणूक झाल्याची माहिती आहे.

रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाविषयक लक्षणे असलेले रुग्ण घेतले जात नाहीत. आधी कोरोनाची तपासणी करुन या, असे त्यांना सांगण्यात आले. आपण डॉक्टर असल्याचे सांगितल्यानंतरही उपस्थित परिचारीकेने वरिष्ठांकडे विचारणा करावी लागेल असे सांगितले. यात वेळ जात असल्याने डॉ. शहा यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. या ठिकाणीही रुग्णावर तातडीने उपचार होण्याची स्थिती दिसून आली नाही. त्यामुळे डॉ. शेख हे जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. याच कालावधीत त्यांची प्रकृती ढासळली. जिल्हा रुग्णालयात तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : मुंबईत ‘कोरोना’ पुन्हा डोके वर काढण्याची भीती, दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 वर

कोरोनाच्या दहशतीमुळे खासगी रुग्णालयांमध्ये प्रचंड काळजी बाळगली जात आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तात्काळ दाखल करुन घेण्यात येत नाही, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. यात आता डॉ. शेख यांच्यासारख्या तज्ज्ञ आयुर्वेदीक वैद्यालाही हार्ट अटॅकनंतर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये वणवण करावी लागल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे यवतमाळकरांनी संताप व्यक्त केला असून सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार मिळत नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. डॉ. शेख हॉस्पिटलमध्ये आले आणि पाच मिनिटातच निघून गेले, त्यांना मोबाईलवर कॉल करुनही त्यांनी उचलला नाही असा प्रतिदावा क्रिटीकेअर हॉस्पिटलने केला. (Yawatmal Ayurvedic Doctor Shaikh Mustak Shaikh Khalil dies after delay in treatment)

एका डॉक्टरलाच उपचारासाठी खासगी रुग्णालयाच्या उंबरठ्यावरुन परत जावे लागल्याने मृत्यू होणे हे निश्चितच दुर्दैवी आहे, सर्वच घटकांनी या प्रकरणी हळहळ व्यक्त केली आहे. सोबतच यापुढे तरी अशा घटना सामान्यांसोबतही घडू नये, या दृष्टीने प्रशासनाने पाऊलं उचलण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

(Yawatmal Ayurvedic Doctor Shaikh Mustak Shaikh Khalil dies after delay in treatment)

Published On - 1:12 pm, Sat, 12 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI