गोड खाण्याची इच्छा झाली? तर बनवा मिनी चोको लावा आप्पे, जाणून घ्या रेसिपी
नेहमीचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ओव्हनशिवाय, घरच्या घरी पॅनमध्ये बनवता येणारे मिनी चोको लावा आप्पे खायला अतिशय स्वादिष्ट लागतात.

गोड खाण्याची इच्छा झाली की आपण नेहमी गुलाबजाम, रसगुल्ला किंवा केक बनवतो. पण, आता नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी नवीन आणि झटपट होणारी रेसिपी ट्राय करूया. मिनी चोको लावा आप्पे ही अशीच एक हटके रेसिपी आहे, जी दिसायला खूप आकर्षक आणि खायला अप्रतिम लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यासाठी ओव्हनची गरज नाही, फक्त आप्पे पॅनमध्ये तुम्ही हे घरच्या घरी सहज बनवू शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून चॉकलेटचा लावा असणारे हे आप्पे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील.
चोको लावा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
मैदा : 1 कप
चोको पावडर : 2 चमचे
साखर पावडर : अर्धा कप
दूध : 1 कप
बेकिंग सोडा : अर्धा चमचा
व्हॅनिला इसेन्स : अर्धा चमचा
चॉकलेट क्यूब्स : 10
तूप किंवा बटर : अर्धा कप
चॉकलेट चिप्स : अर्धा कप
मिनी चोको लावा आप्पे बनवण्याची सोपी पद्धत
स्टेप 1 : सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात मैदा, चोको पावडर, साखर पावडर आणि बेकिंग सोडा घेऊन चांगले मिसळा.
स्टेप 2 : आता त्यात हळूहळू दूध घाला आणि गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने एक स्मूथ बॅटर तयार करा. बॅटर जास्त घट्ट किंवा पातळ नसावे. शेवटी व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळा.
स्टेप 3 : आप्पे पॅन थोडा गरम करून घ्या आणि त्याला तूप किंवा बटर लावून ग्रीस करा. यामुळे आप्पे पॅनला चिकटणार नाहीत.
स्टेप 4 : प्रत्येक आप्पेच्या साच्यात थोडं बॅटर घाला, त्यानंतर मध्यभागी एक चॉकलेट क्यूब किंवा काही चॉकलेट चिप्स ठेवा. चॉकलेट पूर्णपणे झाकले जाईल अशा पद्धतीने त्याच्यावर पुन्हा थोडं बॅटर घाला.
स्टेप 5 : आता आप्पे पॅनवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर 5-6 मिनिटे शिजू द्या. खालची बाजू सोनेरी झाल्यावर आप्पे पलटा आणि दुसऱ्या बाजूने 2-3 मिनिटे शिजवा.
स्टेप 6 : गरमागरम आप्पे एका प्लेटमध्ये काढा. वरून चॉकलेट सिरप किंवा पिठीसाखर घालून सजवा. तुमचा गरमागरम आणि लावासारखा चॉकलेटी पदार्थ तयार आहे!
काही महत्त्वाच्या टिप्स
बॅटरमध्ये कोणत्याही गुठळ्या राहू नयेत याची काळजी घ्या.
लहान मुलांसाठी बनवत असाल तर डार्क चॉकलेटऐवजी मिल्क चॉकलेटचा (Milk Chocolate) वापर करा.
लावा इफेक्टसाठी आप्पे गरमागरम असतानाच खावेत.
हे मिनी चोको लावा आप्पे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही गोड पदार्थ म्हणून बनवू शकता.
