झोपण्याच्या या चुकीच्या पद्धतीमुळे वाढतोय ‘टाइप-2’ डायबिटीसचा धोका; 34 % लोकांमध्ये दिसून येतात ही लक्षणे, तुम्ही पण तीच चूक करताय?
सध्या तरुणांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे सध्याची जीवनशैली. पण त्यामुळे कमी वयातच तरुणांना मधुमेह होण्याचं प्रमाणं वाढलं आहे. पण एका अभ्यासातून समोर आलं आहे की झोपण्याच्या चुकीच्या एका पद्धतीमुळे 'टाइप-2' मधुमेह होण्याचा धोका जास्त होत आहे.

‘लवकर झोपा आणि लवकर उठा..’, असं नेहमीच सांगितलं जातं. अनेकदा घरातील मोठ्या व्यक्तींकडूनही आपण हे ऐकलं असेल. पण सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्य एवढं धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे की आपल्या झोपेचा थेट आपल्याआरोग्यावर थेट परिणाम होतो. असे म्हटले जाते की निरोगी राहण्यासाठी रात्री किमान 7 ते 8 तास झोपणे आवश्यक आहे आणि सध्याच्या परिस्थितीत हे शक्य आहे असं फारच कमीच घडतं. कारण नोकरी, प्रवास यामुळे जेवण उशीरा सुरु होतं आणि झोपायलाही 12 , 1 तर वाजतातच. पण त्यामुळे ‘टाइप-2’ मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे.
तरुणांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे निष्क्रिय जीवनशैली. स्मार्टफोन, व्हिडिओ गेम आणि स्ट्रीमिंग सेवा – तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत
ताण आणि झोपेचा अभाव
बदलत्या जीवनशैलीचा दबाव, शैक्षणिक ताण आणि झोपेचा अभाव यामुळे तरुणांमध्ये मधुमेह होऊ शकतो. सततचा ताण आणि झोपेचा अभाव हार्मोन्सच्या पातळीत व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे वजन वाढते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की अपुरी झोप आणि उच्च ताण पातळी रक्तातील साखर नियंत्रणावर नकारात्मक परिणाम करू शकते.
झोपेची पद्धत अनियमित होती त्यांना इतरांपेक्षा मधुमेहाचा धोका 34% जास्त
अमेरिकन संशोधकांच्या मते, अनियमित झोपेच्या पद्धती असलेल्या लोकांना नियमित झोप घेणाऱ्यांपेक्षा ‘टाइप-2’ मधुमेह होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे. बोस्टनमधील ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील संशोधकांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात सात रात्रींच्या झोपेच्या पद्धतींचा आढावा घेण्यात आला आणि नंतर सात वर्षांहून अधिक काळ अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांच्या झोपेच्या पद्धतींचे अनुसरण करण्यात आले.
संशोधकांना असे आढळून आले की अनियमित झोपेमुळे लोकांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतोय. ज्यांच्या झोपेची पद्धत सर्वात जास्त अनियमित होती त्यांना इतरांपेक्षा मधुमेहाचा धोका 34% जास्त होता. लोकांमध्ये नियमित झोपेची पद्धत म्हणजे अशी असते ज्यामध्ये तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ दररोज सारखीच राहते. अभ्यासात असे आढळून आले की जर लोकांची झोप नियमित असेल तर त्यांना टाइप-2 मधुमेहाचा धोका खूप कमी असतो.
चुकीच्या खाण्याच्या सवयी
आहाराच्या सवयी देखील मधुमेहाचे एक प्रमुख कारण आहेत. प्रक्रिया केलेले अन्न, साखरेचे पेये आणि फास्ट फूड यासारख्या सध्याच्या आहाराच्या सवयींमुळे तरुणांमध्ये या आजाराचा धोका वाढतो. या अन्नपदार्थांमध्ये रिफाइंड साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी भरपूर असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जलद वाढते. कालांतराने, साखरेचे प्रमाण जास्त आणि पोषण कमी असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा आणि चयापचयाचे विकार होऊ शकतात, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो.
जगभरातील जवळजवळ अर्धा अब्ज लोकांना टाइप 2 मधुमेहाचा त्रास असल्याचं दिसून आलं. 2050 पर्यंत, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांची संख्या दुप्पट होण्याचा धोकाही संशोधनादरम्यान सांगण्यात आला आहे.
स्वतःचे असे रक्षण करा
मधुमेह टाळण्यासाठी, निरोगी खाण्याच्या सवयी अंगीकारणे खूप महत्वाचे आहे. याशिवाय, नियमित व्यायाम देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तसेच, पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन असे वातावरण निर्माण करावे जिथे मुले खाण्यापासून ते शारीरिक व्यायामापर्यंत प्रत्येक निरोगी सवयीचे पालन करू शकतील. याशिवाय, रोगाचे लवकर निदान करणे देखील महत्त्वाचे आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि चाचण्यांमुळे इन्सुलिन प्रतिरोधनाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत होऊ शकते, जेणेकरून मधुमेह रोखण्यासाठी वेळेत योग्य उपाययोजना करता येतील.
