कोण आहेत न्यूज अँकर नाजनीन मुन्नी, बांगलादेशात त्यांना विरोध का होतोय?
बांगलादेशात सध्या अराजक माजले आहे. तिथे हिंसक आंदोलन केले जात आहे. असे असताना आता नाजनीन मुन्नी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

Who is Naznin Munni : बांगलादेशात सध्या सगळीकडे अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या तेथील अंतरिम सरकारचे प्रभारी मोहम्मद युनूस खान यांच्यापुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिथे निदर्शनं, मोर्चे काढले जात असून जाळपोळ केली जात आहे. तिथे अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्याही घटना समोर येत आहेत. अशा स्थितीत आता तिथे माध्यमे, माध्यमांच्या कंपनीन धमकी दिली जत आहे. बांगलादेशातील प्रथम आलो आणि द डेली स्टार या माध्यमांच्या कार्यालयांवर ह्लले करण्यात आले असून जाळपोळीही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
न्यूज चॅनेलला आली धमकी
आता तेथील आंदोलक विद्यार्थ्यांनी बांगलादेशातील एक प्रमुख टीव्ही चॅनेलच्या कार्यालयाला आग लावून देण्याचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर रोजी ही धमकी देण्यात आली असून ढागा येथील तेजगांवमध्ये असलेल्या ग्लोबल टीव्ही बांगलादेश या न्यूज चॅनेलच्या कार्यालयात सात ते आठ युवक घुसले.
नाजनीन यांना पदावरून हटवण्याची मागणी
त्यांनी या चॅनलच्या प्रमुख नाजनीन मुन्नी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. आमची मागणी पूर्ण न केल्यास आम्ही या कार्यालयावर हल्ला करू, असा इशारीही या तरुणांनी दिला आहे. त्यामुळेच आता नाजनीन मुन्नी बांगलादेश तसेच जगभरात चर्चेचा विषय झाल्या आहेत.
नाजनीन हसीना यांच्या समर्थक असल्याचा दावा
नाजनीन मुन्नी या वरिष्ठ पत्रकार आहेत. त्या ग्लोबल टीव्ही बांगलादेश या न्यूज चॅनेलच्या न्यूज हेड आणि प्रसिद्ध अँकर आहेत. त्या शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाच्या समर्थक असल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळेच त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी केली जात आहे.
नाजनीन यांनी सांगितला सगळा प्रकार
ही घटना घडल्यानंतर नाजनीन मुन्नी यांनी सोशल मीडियावर हा सर्व प्रकार सांगितला आहे. ऑफिसमध्ये आलेल्या तरुणांनी मला धमकी दिली आहे. मी राजीनामा न दिल्यास, पद न सोडल्यास कार्यालयाला आग लावली जाईल, अशी धमकीच तरुणांनी दिली आहे, असे नाजनीन यांनी सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारची धमकी ही माध्यम स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
