बिस्किट की कुकीज? जाणून घ्या फरक आणि घरगुती कुकीजची सोपी रेसिपी
बिस्किटे किंवा कुकीजशिवाय चहा अपूर्ण वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या दोघेही वेगवेगळ्या पद्धतींनी बनवल्या जातात? आपण यातील फरक आणि घरी झटपट कुकीज बनवण्याची सोपी कृती पाहणार आहोत.

चहाच्या वेळेला बिस्किट आणि कुकीजची साथ नसेल तर मजाच येत नाही, नाही का? पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बिस्किट आणि कुकीजमध्ये काय फरक असतो? बऱ्याचदा आपण दोघांना एकच समजतो, पण या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आज ‘नॅशनल शुगर कुकीज डे’ आहे आणि या निमित्ताने आपण हा फरक जाणून घेणार आहोत, तसेच घरी झटपट कुकीज कशा बनवायच्या याची सोपी रेसिपीही पाहणार आहोत.
बिस्किट आणि कुकीजमध्ये काय आहे फरक?
खरं तर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये बिस्किटांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, पण त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीत फरक असतो.
कुकीज : या बिस्किटांपेक्षा नरम, थोड्या चिकट आणि जाडसर असतात. यामध्ये फॅट (लोणी/तूप) आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. कुकीजला मिठाई (डेझर्ट) च्या श्रेणीत ठेवलं जातं. बाजारात मिळणाऱ्या कुकीज अनेकदा गहू, नाचणी, ज्वारी किंवा बाजरीसारख्या जाडसर धान्यांपासून बनवल्या जातात, त्यामुळे त्या बिस्किटांपेक्षा आरोग्यासाठी जास्त चांगल्या मानल्या जातात. तुम्ही त्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवू शकता.
बिस्किट : ही कुरकुरीत, कोरडी, कडक आणि कमी गोड असतात. बिस्किटांना स्नॅक (हल्का नाश्ता) मानलं जातं. बाजारात मिळणारी बहुतेक बिस्किटं प्रोसेस्ड (प्रक्रिया केलेली) असतात आणि ती मैदापासून बनतात.
थोडक्यात सांगायचं तर, कुकीज जास्त पौष्टिक आणि घरी बनवायला सोप्या असतात, तर बिस्किटं जास्त करून पॅकेटमध्ये येतात आणि मैदा वापरून बनवलेली असतात.
झटपट शुगर कुकीज घरी बनवण्यासाठी साहित्य:
घरी अचानक पाहुणे आले आणि काही गोड खाऊ नसेल तर ही रेसिपी तुमच्या मदतीला येईल.
गव्हाचं पीठ – 1 कप
ब्राउन शुगर – 1/2 कप
तूप/ बटर/ ऑलिव्ह ऑईल – 1/4 कप
बेकिंग पावडर – 1/2 चमचा
दूध – 2 ते 3 मोठे चमचे (गरजेनुसार)
व्हॅनिला इसेन्स – 1 चमचा
चिमूटभर मीठ
शुगर कुकीज बनवण्याची सोपी पद्धत
एका मोठ्या भांड्यात तूप/बटर आणि ब्राउन शुगर एकत्र घेऊन चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण क्रीमसारखं मऊ झालं पाहिजे. त्यानंतर त्यात व्हॅनिला इसेन्स टाका.
आता दुसऱ्या भांड्यात गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा.
आता ओलं (तूप-साखर मिश्रण) आणि सुकं मिश्रण (पीठ) एकत्र करून मिक्स करा. गरजेनुसार थोडं दूध घालून एक मऊ पीठ मळून घ्या.
हे मळलेलं पीठ 10 – 15 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा.
फ्रिजमधून काढल्यावर पिठाला लाटून तुम्हाला हव्या त्या आकारात कुकीज कापून घ्या.
ओव्हन 180°C वर आधीच गरम करून घ्या आणि त्यात कुकीज 10-12 मिनिटं बेक करा, किंवा त्या सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
जर तुमच्याकडे ओव्हन नसेल, तर तुम्ही तव्यावर मंद आचेवरही या कुकीज भाजू शकता.
कुकीज तयार झाल्यावर थंड करून चहासोबत किंवा नुसत्याच सर्व्ह करा!
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
