कारल्याचा ठेचा करा, गोड बायकोच्या ताटात वाढा; आरोग्यदायी रेसिपी जाणून घ्या
कारल्याचा ठेचा हा कडूपणा, तिखटपणा आणि खमंगपणा यांचा एकप्रकारे संगम आहे. चला तर मग आज या कारल्याच्या ठेच्याची रेसिपी जाणून घेऊया.

कारलं म्हणजे अनेकांना नकोसं वाटणारं पण अतिशय पौष्टिक. यात कडूपणा असला तरी आरोग्यासाठी ते अमृतासमान आहे. कारल्याचा ठेचा ही पारंपरिक कोकण आणि महाराष्ट्रातील एक खास डिश आहे, जी तिखट, खमंग आणि थोडीशी कडवट चव एकत्र आणते. हा ठेचा भात, पोळी किंवा भाकरीसोबत खाल्ला की खासच लागतो. आता हा ठेचा करण्यासाठी साहित्य नेमके काय घ्यावे, याची माहिती पुढे दिली आहे. जाणून घेऊया.
कारल्याचा ठेचा बनवण्याचे साहित्य
- कारले- 4 ते 5 मध्यम आकाराची
- हिरव्या मिरच्या- 5 ते 6
- लसूण- 8 ते 10 पाकळ्या
- शेंगदाणे- 2 टेबलस्पून (भाजून घेतलेले)
- मीठ- चवीनुसार
- लिंबाचा रस- 1 टेबलस्पून
- तेल- 2 टेबलस्पून
- हळद- 1:4 टीस्पून
- मोहरी- 1:2 टीस्पून
- हिंग- चिमूटभर
आता कारल्याचा ठेचा बनवण्याची कृती नेमकी काय आहे, याची माहिती पुढे वाचा
कृती
कारल्याच्या ठेच्याची तयारी कशी करावी?
सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्याचे पातळ काप करा. त्यावर थोडं मीठ लावून 10-15 मिनिटं बाजूला ठेवा. त्यामुळे कारल्यातील अतिरिक्त कडूपणा निघून जातो. त्यानंतर हे काप हाताने पिळून घ्या, जेणेकरून पाणी निघेल.
फोडणी तयार करणे
कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर हिंग, हळद आणि लसूण पाकळ्या घाला. लसूण थोडा सोनेरी रंग येईपर्यंत परता.
कारले परतणे
आता पिळलेले कारल्याचे काप टाका आणि मध्यम आचेवर छान तांबूस आणि कुरकुरीत होईपर्यंत परतत ठेवा. कारलं नीट तळल्याने त्याचा कडूपणा कमी होतो.
मिरच्या आणि शेंगदाणे घालणे
त्यात हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे घाला. सर्व मिश्रण एकत्र करून 5-7 मिनिटे परता.
ठेचा तयार करणे
सर्व परतलेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्या (बारीक करू नका). नंतर लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. तुमचा “कारल्याचा ठेचा” तयार आहे.
कारल्याचा ठेचा कशासोबत वाढावा?
हा ठेचा गरम भात, तूप आणि पोळी, भाकरीसोबत खूप छान लागतो. थोडा दही किंवा ताक सोबत दिल्यास चवीला अप्रतिम संतुलन मिळते.
आरोग्यदायी फायदे
- कारलं मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं
- शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते.
- पचन सुधारतं आणि भूक वाढवते.
- लसूण आणि मिरच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
- तेल कमी वापरल्यास हा ठेचा वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
कारल्याचा ठेचा हा कडूपणा, तिखटपणा आणि खमंगपणा यांचा परिपूर्ण संगम आहे. घरगुती आणि पारंपरिक चव हवी असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा. एकदा खाल्ल्यावर कारल्याबद्दलचा तिटकारा नक्की कमी होईल.
