पावसाळ्यात सकाळी काय कराल तर आजारांपासून राहाल दूर? वाचा आयुर्वेदिक सल्ला
पावसाळा म्हणजे निसर्गाचं सौंदर्य, पण याच वेळी विविध आजारही डोके वर काढतात. त्यामुळे योग्य पद्धतीने काळजी घेतली, तर रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते आणि तुम्ही व तुमचं कुटुंब पावसाळ्यातही निरोगी राहू शकता.

पावसाळा हा जितका निसर्गासाठी सुखावणारा, तितकाच आरोग्यासाठी आव्हानात्मक असतो. हवामानातील बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, पचनक्रिया मंदावते आणि संसर्गाचा धोका वाढतो. अशा वेळी सकाळची योग्य आणि संतुलित सुरुवात केल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि आरोग्यही मजबूत राहतं. याच पार्श्वभूमीवर आयुर्वेदात सकाळच्या दिनचर्येला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जाणून घेऊया पावसाळ्यात सकाळ कशी सुरू करावी, जेणेकरून शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील.
सकाळी कोमट पाणी पिणे : पावसाळ्यात सकाळची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करावी. हे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतं आणि पचनसंस्था सक्रिय करतं. यात लिंबाचा रस किंवा हळद मिसळल्यास अतिरिक्त फायदे होतात.
ऑइल पुलिंग : तिळाचं किंवा खोबरेल तेल तोंडात 5-10 मिनिटे धरून ठेवून फिरवल्यास तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात आणि प्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यात संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा उपाय फार उपयुक्त ठरतो.
हर्बल चहा : तुळस, आले आणि मिरी यांचे हर्बल चहा रोज सकाळी घ्यावा. या चहामुळे श्वसनसंस्था मजबूत होते, गळा साफ राहतो आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळतं. याशिवाय पचनशक्तीही सुधारते.
प्राणायाम : पावसाळ्यात रोज सकाळी ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम केल्यास फुफ्फुसांना बळकटी मिळते. सकाळी रिकाम्या पोटी प्राणायाम केल्यास मन शांत राहतं आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. हे मानसिक ताण कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
तेल मालिश : पावसाळ्यात नहाण्यापूर्वी संपूर्ण शरीरावर आयुर्वेदिक तेलाने मालिश करावी. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं, शरीर हलकं वाटतं आणि स्नायूंना आराम मिळतो. ही सवय मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक आहे.
सकाळी का असावी सशक्त सुरुवात?
पावसाळ्यात आळस, थकवा, जडपणा, संक्रमण ही सामान्य लक्षणं असतात. परंतु सकाळची योग्य दिनचर्या स्वीकारल्यास या त्रासांपासून बचाव करता येतो. आयुर्वेदानुसार, दिवसाची सकाळीची सुरुवात ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी मानली गेली आहे. लहान लहान चांगल्या सवयींचा मोठा परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होतो.
पावसाळ्यात सकाळी उठल्यावर खाल्ले पाहिजेत हे 3 फळं
1. सफरचंद – सकाळी एक सफरचंद खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि पचन सुधारतं. यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात जे पावसाळ्यात होणाऱ्या अपचनापासून संरक्षण करतात.
2. केळं – केळं खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे ते स्नायूंना बळकटी देतं आणि पावसाळ्यात होणाऱ्या थकव्यापासून बचाव करतं.
3. संत्रं – संत्र्यात व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असतं, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी हे फळ खूप उपयुक्त ठरतं.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
