ठाकरे गटात होणार मोठा बदल, आदित्य ठाकरेंना मिळणार प्रमोशन
शिवसेना ठाकरे गटात मोठे संघटनात्मक बदल होणार आहे. जून महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्ष (Working President) पदी नियुक्ती करण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर केला जाऊ शकतो, असे बोललं जात आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकांचे सत्र संपल्यानंतर आता अनेक पक्षात संघटनात्मक बदल केले जात आहे. त्यातच आता येत्या जून महिन्यात शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल आणि तो मंजूर केला जाईल. या पदोन्नतीनंतर आदित्य ठाकरे पक्षात स्वतःची स्वतंत्र टीम तयार करतात का किंवा संघटनेत कोणते नवीन बदल घडवून आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व निर्णायक ठरणार
कार्याध्यक्षपद मिळाल्यास आदित्य ठाकरे पक्षात स्वतःची नवी आणि तरुण टीम तयार करण्याची शक्यता आहे. यामध्ये निष्ठावंत युवा कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळू शकते. तसेच संघटनेत फेरबदल केले जाऊ शकतात. तळागाळातील संघटना अधिक बळकट करण्यासाठी बूथ स्तरावर आणि जिल्हा स्तरावर काही मोठे फेरबदल होतील, असेही बोललं जात आहे. निवडणुकांनंतरच्या काळात पक्षाची ध्येयधोरणे आणि आक्रमकता वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व निर्णायक ठरणार आहे, असे बोललं जात आहे.
२००३ मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती
राजकीय वर्तुळात या संभाव्य बदलाची तुलना २००३ मधील महाबळेश्वर अधिवेशनाशी केली जात आहे. २००३ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे हे अधिक सक्रियपणे राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली. आता पुन्हा एकदा त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात अधिक अधिकार दिले जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जबाबदारी स्वीकारली होती, तशीच प्रक्रिया आता आदित्य ठाकरेंच्या बाबतीत घडताना दिसत आहे. जर ही नियुक्ती झाली, तर आगामी काळात ठाकरे गटासाठी ही एक मोठी रणनीती हालचाल मानली जाईल. आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर नवी धुरा सोपवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या घडीला ठाकरे गटाकडून यावर अधिकृतपणे मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जूनमधील ही बैठक पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
