मोठी बातमी, राजकारणातील परस्परांचे कट्टर विरोधक सुजय विखे पाटील-बाळासाहेब थोरात आले एकत्र
Sujay Vikhe Patil-Balasaheb Thorat: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला. दुष्काळाचे कारण पुढे करत यंदा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा असा सर्व मामला दिसत आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक वेगळंच राजकीय वळण आलं. बँकेची पंचवार्षिक निवडणूक सामोपचाराने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच संगमनेर येथे आयोजित बैठकीत दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या बैठकीत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोक प्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यावर यंदा राजकीय नेत्यांचा भर असल्याचे समोर आले आहे. दुष्काळाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारणी या निवडणुकीसाठी एकमत घडवून आणत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध?
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही राबवण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा हा प्रयोग झाला होता. हीच पंरपरा यंदाही पुढे घेऊन जाण्याचा राजकीय नेते मंडळींचा मानस आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात व्यापक हितासाठी हे मंडळी एकत्र येण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचं वातावरण तापलं
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंनी स्वत:साठी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. रविवारी झालेल्या या बैठकीला राम शिंदेंची अनुपस्थिती दिसून आली. सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात एकत्र आल्याची चर्चा रंगली. या बैठकीला माजी मंत्री शंकरराव गडाख, डॉ. सुधीर तांबे, आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
राम शिंदेंचा पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना चिमटा
संगमनेर येथे आयोजित बैठकीवरून विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना चांगलाच चिमटा काढला. सुजय विखे या बैठकीला होते, मात्र पालकमंत्र्यांना त्याची माहिती नव्हती. सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात प्रथम दर्शनी मतभेद असल्याचे दिसतं, असा टोला राम शिंदे यांनी लगावला. संगमनेर बैठकीबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी समोर येऊन बोलावं, असे राम शिंदे म्हणाले.
