मत चोरीच्या आरोपांवर अजितदादा पहिल्यांदाच बोलले, जोरदार हल्लाबोल, नेमका कोणावर साधला निशाणा?
विरोधकांकडून सातत्यानं मत चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत, याला उत्तर देताना अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मत चोरीचा आरोप त्यांनी केला आहे, त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून याच मुद्द्यावरून आता सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या या आरोपांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
विरोधकांकडे काही मुद्देच नाहीत. मत चोरी वगैरे हे फेक नरेटिव्ह आहेत. मध्यंतरी काँग्रेसकडे काही राज्यांची सत्ता गेली, त्यावेळी मतचोरी, ईव्हीएम त्यांना दिसलं नाही. सत्ता गेली की मग ईव्हीएम आणि मत चोरीचे मुद्दे समोर आणले जातात, यात काहीही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठी बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे, जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, वातावरण शांत राहावं असं प्रत्येक सरकारला वाटत असते. पण समोरचा व्यक्ती कसा प्रतिसाद देतो, त्यावर हे अवलंबून असतं. मात्र प्रत्येकाची काळजी घेणं हे सरकारचं काम असतं. सरकार म्हणून आम्ही मोर्चाबद्दल चर्चा केलेली आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी प्रभाग रचनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाग रचना मध्ये मायनस आणि प्लस 10 टक्के इकडे-तिकडे होत असतं. माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे, की प्रभाग रचना कशी ही असली तरी जो लोकांची कामं करतो, त्याला याचा फारसा फरक पडत नसतो. मुळातच प्रत्येकाला हवी तशी रचना होत नाही, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
