अजित पवार यांना मोठा धक्का, बड्या नेत्याने साथ सोडली, काँग्रेसला लॉटरी!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असतानाच आता अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Nanded NCP News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. स्थानिक नेते उमेदवारीची सोय करण्यासाठी वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आहेत. तर काही नेते हे आपली राजकीय सोय पाहून पक्षांतर करताना दिसत आहेत. सत्तेतील आणि विरोधी बाकावर असलेल्या सर्वच पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर पक्षांतराची लाटच आल्याचे दिसत आहे. आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पक्षबदल करत आहेत. असे असतानाच आता नांदेड जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष यांच्यासह बऱ्याच महत्त्वाच्या पदाधिकऱ्यांनी पक्षाला रामराम केला आहे. नांदेड जिल्ह्यात अजित पवारा यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
नेमकं काय घडलं आहे?
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह मोठा गट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. यामध्ये 4 माजी नगराध्यक्ष, 23 माजी नगरसेवक, 8 नगरसेवक, 2 माजी जिल्हा परिषद सदस्य यासह माजी पंचायत समिती सभापती यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी थेट काँग्रेसमध्ये जात असल्याने अजित दादांसाठी नांदेडमध्ये हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. आता उद्या (28 ऑक्टोबर) 28 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे त्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. रामदास पाटील यांनी तशी माहिती दिली आहे.
काँग्रेसला उभारी मिळणार का?
दरम्यान, आम्ही पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्षाचे काम करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा कसा फडकेल, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू असे रामदास पाटील यांनी सांगितले आहे. याच कारणामुळे या सर्वांच्या पक्षप्रवेशाने नांदेडच्या देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडणार? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणारी ही इन्कमिंग या मतदारसंघात उभारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
