Ajit Pawar : मधलंच वाक्य उचलून टीका… पैशांचं सोंग आणता येत नाही वक्त्यावर अजित दादांचं स्पष्टीकरण
लोकांची घरच्या घरं पाण्यात गेलेली असल्याने त्यांचं धान्य भिजलं, काही धान्य खराबही झालं. त्यामुळे त्यांना लगेचच कुठं निवारा मिळत नाहीये. त्यामुळे काही बाबतीत आपण शाळांमध्ये किंवा कार्यालयात त्यांना शिफ्ट केलं आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे, त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं असून अतिवृष्टीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. मराठवाड्यासह अनेक भागांत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत, पुरामुळे अगदी दैना उडाली आहे. शेती, माती, पिकं, गुरंढोरं सगळं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठं नुकसान झालं असून बळीराजा चिंतेत आहे. त्रस्त शेतकऱ्यावा आता सरकारकडूनच मदतीची अपेक्षा असून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करत नुकसानीचा आढावा घेतला.
त्यानतंर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केंद्र सरकारला मदतीसाठी पत्र पाठवलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते, त्यांना शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, पंचनामे याबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी एकूण परिस्थितीची आढावा सांगत मदतीसाठी काय उपयायोजना करण्यात आल्या आहे, त्याची सविस्तर माहिती दिली.
घरात पाणी गेलं , त्यांना तातडीने 5 हजार रुपयांची मदत
मी काल रात्रीपर्यंत तिथे फिरत होतो, कालही पाऊस पडत होता. परवा संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोकं अडकलेले होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं काम सुरू होतं, मिलिट्रीही मदत करत होती. एअरलिफ्टींगही करण्यात आले, तसेच एनडीआरएफच्या टीमनेही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. सगळं प्रशासन, त्या त्या जिल्ह्यातले अधिकारी कामाला लागले आहेत. ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे, त्यांना कालपासून आम्ही तातडीने 5 हजार रुपये आणि 5 किलो गहू- 5 किलो तांदूळ असं 10 किलो धान्य दिलं, असं अजितदादांनी सांगितलं.
पण एक गोष्ट लक्षात आली की त्या लोकांची घरच्या घरं पाण्यात गेलेली असल्याने त्यांचं धान्य भिजलं, काही धान्य खराबही झालं. त्यामुळे त्यांना लगेचच कुठं निवारा मिळत नाहीये. त्यामुळे काही बाबतीत आपण शाळांमध्ये किंवा कार्यालयात त्यांना शिफ्ट केलं आहे. पण त्यांना 10 किलो अन्न पुरणार नाही, म्हणून ते अन्न धान्य वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याशी चर्चा करून, अधिक मदत कशी करता येईल त्यावर तोडगा काढत आहो, असे अजित पवार म्हणाले.
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यात आले, त्यांना आपण याबद्दल सांगितलं, पंतप्रधानांनाही मदतीसाठी पत्र दिलं आहे. या संकटात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार मदत करत आहेच, पण केंद्र सरकारनेही मदत करावी अशी मागणी करणारं पत्र लिहील्याचं त्यांनी नमूद केलं.
हवामान विभागाचा पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
27, 28 आणि 29 तारखेला हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यांनी रेड अलर्ट म्हणून जाहीर केलं आहे. सोलापूर, धाराशिव, बीड , छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्यावर असताना तेथील लोकांना सावध, अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. तेथील परिस्थितीकडे डिझास्टर मॅनेजमेंटही लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ पातळीपासून ते खालच्या पताळीपर्यंत सर्वांना अलर्ट करण्यात आल्याचंही पवारांनी सांगितलं.
सगळी सोंग आणता येतात, पैशांचं नाही, त्या वक्तव्यावर अजित पवारांचा खुलासा
धाराशिवच्या दौऱ्यावर असताना, पूरग्रस्तांशी बोलताना अजित पवार हे काही वेळासाठी संतापले होते. ” सगळी सोंग आणता येतात, पण पैशांचं सोंग आणता येत नाही” असं वक्तव्य त्यांनी केलं, त्यावरून बरीच टीकाही झाली. मात्र आता त्यावर अजित दादांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ग्रामीण भागा गेल्यावर तिथल्या लोकांना समजेल अशा भाषेत मी बोलतो. आपण आपल्या घरात जसं बोलतो, तशी भाषा मी वापरतो. आपणही कित्येकदा बोलताना म्हणतो ना की बाबा रे पैशांचं सोग घेता येत नाही. काही गोष्टी बजेटमध्ये बसवाव्या लागतात, त्या अर्थाने मी बोललो होतो. पण विरोधकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला. ते वाक्य बोलण्याआधी, त्यानंतर मी काय बोललो, ते विरोधक ऐकतच नाहीत, मधलं एक वाक्य घेतात आणि टीका, टोमणे सुरू करतात, अशी टीका करत अजित पवारांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
