5 हजार रुपये, 35 किलो धान्य, नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यास सुरूवात, पण सरकारचा नियम काय?
अजित पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्यास सुरुवात झाली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच हे संकट मोठे असल्याचेही ते म्हणाले.

Ajit Pawar On Maharashtra Flood : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड, धाराशीव, परभणी यासारख्या जिल्ह्यांमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेले आहे. काही ठिकाणी तर शेतातील मातीदेखील वाहून गेल्याचे समोर आले आहे. काही शेतातील पीक थेट पाण्याखाली गेले आहे. याच स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच हे संकट फार मोठे असल्याचे म्हणत केंद्र सरकातर्फे भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सोबतच त्यांनी आता नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्यास सुरुवात झाल्याचेही सांगितले आहे.
एक ग्रॅमही कापूस निघणार नाही अशी…
पाहणी करताना अजित पवार यांनी टीव्ही 9 मराठीला अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. अशा प्रकारचं संकट कधीच कोणावरही येऊ नये. पण निसर्ग कोपला तर काय घडू शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हे नुकसान आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचून गेले आहेत. पूल वाहून गेले आहेत. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एका शेतकऱ्याच्या शेतातून एक ग्रॅमही कापूस निघणार नाही अशी स्थिती आहे. आम्ही आता बीड जिल्ह्यात पंचनाम्यांना सुरुवात केली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
5 हजार रुपये आणि 35 किलो तांदूळ कोणाला मिळत आहेत?
तसेच पुढे बोलताना, या भागातील शेतकऱ्यांचे तसेच इतर ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. या लोकांना पुन्हा कसे उभे करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात झालेली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. घरात पाणी गेल्यामुळे ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांना तातडीची मदत म्हणून सध्या 5 हजार रुपये आणि 35 किलो तांदूळ दिले जात आहेत. याला सुरुवात झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती अजित पवार यांनी दिली. म्हणजेच सरकारच्या सध्या तातडीची मदत केली जात आहे. त्यानंतर पंचनामे करून भरीव मदत केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
आता पुढची प्रक्रिया…
सरकारतर्फे पंचनाम्यांना कधीपासून सुरुवात होणार, याबाबतही त्यांनी सांगितले आहे. मला काही लोकांनी सांगितले की आम्हाला 5 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. आता पुढची प्रक्रिया ही पंचनाम्यांची आहे. काही लोक हे असुरक्षित ठिकाणी होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्रशासनाचे सर्व लोक याच कामात व्यग्र होते. आता या टीमला सांगून पंचनामे सुरू करायला सांगितले आहे. जेवढ्या गतीने पंचनामे करता येतील तेवढ्या वेगाने करा असे निर्देश आम्ही दिले आहेत, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या मदतीवर काय म्हणाले?
केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे मुंबईत येत आहेत. त्यांच्या कानावर नुकसानीची स्थिती सांगितली जाईल. मुख्यमंत्री सरकारच्या वतीने शाहा यांना पत्र देणार आहेत. संकट फार मोठं आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, पंजाब राज्यांना जशी मदत देण्यात आलेली आहे, त्यापेक्षाही जास्त मदत आपल्याला लागणार आहे. पंचनामे झाल्यावर किती नुकसान झाले याचा आकडे समोर येईल, असे अजित पवारांनी सांगितले.
