10 दिवसांच्या चिमुकल्याला विळ्याचे 39 चटके; मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस
Amravati Melghat : मेळघाटातील अजून एक अघोरी प्रकार समोर आला आहे. कुषोपणामुळे कुप्रसिद्ध झालेल्या मेळघाटाला अंधश्रद्धेचा पण विळखा आहे. 10 दिवसांच्या चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अजून एक अघोरी प्रकार घडला आहे. एका 10 दिवसांच्या चिमुकल्याच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामुळे या भागातील अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. तर प्रशासकीय यंत्रणा कुपोषणच नाही तर अंधश्रद्धा दूर करण्याबाबतही अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले आहे. अशा घटनांना पायबंद घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागातील बुवाबाबा, भुमकांवर कारवाईची मागणी केली आहे.
पोटफुगीसाठी विळ्याचे चटके
मेळघाटातील दहेंद्री गावात एका दहा दिवसाच्या बालकाला पोटफुगी झाली होती. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्यावर अघोरी उपचार करण्यात आले. दहा दिवसाच्या बाळाच्या पोटाला गरम विळ्याने 39 चटके देण्यात आले. मेळघाटात अजूनही “डंबा”वर अघोरी उपचार पध्दतीचा वापर करण्यात येतो. त्यात पोटफुगी, पोटासंबंधीच्या विकारावर पोटाला गरम विळ्याचे चटके देण्यात येतात.
अखेर गुन्हा दाखल
या घटनेच्या 10 दिवसानंतर ही बाब समोर आली. प्रकरणात चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली सध्या बाळाची प्रकृती चांगली आहे. “डंबा” दिल्याने पोटफुगी कमी होते अशी मेळघाटात अंधश्रद्धा आहे. चार महिन्यापूर्वीही एका बावीस दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके दिले होते.
ही प्रथा मोडीत निघणार की नाही
यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मुलाची तब्येत चांगली झाली नाही की मग त्यांना रुग्णालयात आणण्यात येते. तेव्हा त्यांच्यावर डंबा प्रयोग केल्याचे लक्षात येते. तर अनेक घटना समोर येत नाहीत. पोटफुगी सारख्या आजारांवर पोटाला गरम चटके देणं हा संतापजनक प्रकार शासनाने मोडीत काढण्याची मागणी सातत्याने होत आहे. दूषित पाणी वा इतर कारणांमुळे होणाऱ्या रोगांसाठी ही अमानुष पद्धत वापरण्यात येते. बुवाबाजी करणारे मांत्रिकांवर, भुमकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.