Bacchu Kadu : आता मौन नाही…उत्तर द्या! बच्चू कडू यांचा एल्गार, 7/12 कोरा करण्याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

Bachhu Kadu Big Demand : रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यानंतर प्रहारचे बच्चू कडू यांनी त्यांचा मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याविषयी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

Bacchu Kadu : आता मौन नाही...उत्तर द्या! बच्चू कडू यांचा एल्गार, 7/12 कोरा करण्याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारला जाब
बच्चू कडूंचा प्रहार
| Updated on: Oct 24, 2025 | 1:00 PM

Bacchu Kadu on Fadnavis : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा ठेवणीतील शस्त्र बाहेर काढले आहेत. दिवाळीत त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता त्यांनी पुन्हा सरकारकडे, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे. नव्याने आंदोलनाची हाक दिली आहे. यावर्षी जून महिन्यात त्यांनी सरकारच्या नाकात चांगलाच दम आणला होता. त्यावेळी अन्नत्याग आंदोलन केले होते. तर नंतर कर्जमाफीसाठी त्यांनी विदर्भ पिंजून काढला होता. अनेक जिल्ह्यात त्यांनी कर्जमाफीसाठी पदयात्रा काढली होती.

कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडू यांनी कर्जमाफी, 7/12 कोरा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. 7 व्या दिवशी आंदोलन पेटल्यानंतर तातडीने सरकारने त्यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर बच्चू कडू यांनी विदर्भात कर्जमाफीसाठी पदयात्रा सुद्धा काढली. या यात्रेत त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कर्जमाफी किती गरजेची आहे ते पटवून दिले. आता अतिवृष्टीने राज्यातील 29 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पण भरीव मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर सरकारला कर्जमाफीचा विसर पडू नये यासाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात उतरले आहेत. या महिन्याच्या अखेरीस ते आंदोलनाचा पुकारा करतील.

आता मौन नाही, उत्तर द्या

अमरावतीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्याचं प्रतिकात्मक कार्टून बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांनी टीका केली. त्यांची ही पोस्ट सध्या समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. “फडणवीस साहेब किती दिवस दिलेला शब्द तोंडात धरून बसणार? राज्याच्या शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय” असा टोला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

28 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची तयारी

7/12 कोरा करा. तो शेतकऱ्यांचा हक्क आहे असे बच्चू कडू यांनी मागणी केली. 28 ऑक्टोंबरला नागपूरची भूमी उत्तर मागेल. आता मौन नाही. उत्तर हवंय. चला नागपूर, शेतकऱ्यांचा एल्गार उठणार! असा इशाराच बच्चू कडू यांनी सोशल मीडियाद्वारे दिला. त्यामुळे 28 ऑक्टोबर रोजी नागपूरमधून नव्याने आंदोलन सुरू होणार असल्याचे समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी प्रहार सरकारची डोकेदुखी वाढवणार असल्याचे समोर येत आहे.