Bachhu Kadu : आंदोलन मागे नाही तर… मंत्रालयात घुसून, बच्चू कडू यांचा सरकारला खणखणीत इशारा, मागण्या मंजूरीसाठी इतक्या दिवसाची मुदत
Bachhu Kadu Food Protest Withdrawal : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी सुटले. अर्थात यावेळी त्यांनी हे आंदोलन मागे नाही तर पुढे ढकल्याचे सरकारला बजावले. जर दगाफटका केला तर सरकारला धडा शिकवण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी सुटले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत होता. कालपासून सरकार त्यांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून प्रयत्न करत होते. आज मंत्री उदय सामंत हे आश्वासनाचा खलिता घेऊन मोझरीत दाखल झाले. त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण सुटल्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी हे आंदोलन मागे घेतले नाही तर पुढे ढकल्याचे त्यांनी सरकारला बजावले. जर सरकारने दगाफटका केला, विश्वासघात केला तर मंत्रालयात घुसून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. आम्ही सांगू नागपूरला आणि आंदोलन करू मुंबईला. सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा दाखवू असे सूचक इशारा त्यांनी उपोषण सोडताना दिला.
राज्य सरकारला डेडलाईन
सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहेत. काही तांत्रिक बाबींची पुर्तता कराव्या लागतात. सरकारला आम्ही 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत देतो. जर तोपर्यंत मागण्या मान्य करून त्यावर योग्य ती अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मंत्रालयात घुसू. तिथे आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. त्यांनी सरकारला डेडलाईन दिली आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. त्यादिवशी भगतसिंह यांच्यासारखे आंदोलन करू असा सज्जड दमच कडू यांनी भरला.
काय म्हणाले कडू?
अजित दादा म्हणत होते मी कुठं म्हटलं कर्जमाफी होणार पण आज आमचे कार्यकर्ते यांनी आंदोलन केल्यावर आज ते बोलले. फडणवीस यांनी कर्जमाफीवर मौन पाडल होत आता ते कर्जमाफी वर बोलायला लागले. आपण कर्जमाफी च्या मागणीवर 90 टक्के यश मिळवलं. दिव्यांगच्या 20 मागण्या आपण मान्य करून घेतल्या. मुख्यमंत्री तारीख दयायला तयार नाही. पण मी 2 ऑक्टोबर तारीख दिली. या ऑक्टोबर पर्यत मी संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे. मी 16 तारखेपासून पाणी त्याग आंदोलन करणार होतो. तूर्तास आंदोलन मागे घेऊ. पुन्हा 2 ऑक्टोंबर पासून आंदोलन करू, असे कडू म्हणाले. यावेळी उपोषण करणाऱ्या वृद्ध आजीने बच्चू कडू यांचे उपोषण सोडले. तुम्ही आमचा विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन करू असे कडू मंत्री उदय सामंत यांना म्हणाले. यावेळी उद्याचा चक्का जाम रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली.
2 ऑक्टोबरपर्यत कर्जमाफीची तारीख सांगावी, नाही तर मंत्रालयात घुसू. मतदान कोणालाही मारा मात्र आंदोलन करण्यासाठी आमच्या सोबत या, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्यांनी आत्महत्या करण्याची गरज नाही. कर्ज वसुलीची सक्ती केली तर बँकवाल्याला गावात झाडाला बांधा असे वक्तव्य बच्चूभाऊंनी केले.
