अमरिश पटेलही शरद पवार गटाच्या वाटेवर? राजकारणात पडद्यामागे काय घडतंय?
शरद पवारांच्या धुळे जिल्ह्या दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागताला भाजपचे आमदार अमरिश पटेल हजर राहिल्यानं जिल्ह्यात विविध चर्चा सुरु आहेत.
अनेक सत्ताधारी नेते शरद पवारांच्या भेटीला जाण्याचा सिलसिला सुरु असतानाच धुळ्यात भाजपचे आमदार अमरिश पटेल देखील पवारांच्या स्वागताला हजर राहिले. जिल्ह्यात दिवसभर भेटीची चर्चा रंगली. शिंदखेडा तालुक्यातल्या मेळाव्यानिमित्त शरद पवार शिरपूरच्या विमानतळावर उतरले. त्यावेळी स्वागतासाठी भाजपचे अमरिश पटेल आलेले पाहून तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आहात म्हणून शरद पवारांनी मिश्किल सवाल करताच हशा पिकला.
धुळे आणि नंदुरबार जिल्हा कधी-काळी काँग्रेसचा गड होता. 2019 च्या तोंडावर आधी नंदुरबारचं गावित कुटुंब त्यानंतर शिरपूरच्या अमरिश पटेलांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपात जाणं पसंत केलं. यावेळी अमरिश पटेलांनी पवारांच्या स्वागताबद्दल खुलासा केला असला तरी आपल्याला शरद पवारांनीच राजकारणात संधी दिली, असं सांगून त्यांनी संकेत दिल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, शिंदखेड्यात शेतमालाचे घसरलेले भाव आणि दमदाटीच्या राजकारणावरुन शरद पवारांनी भाजपला लक्ष्य केलं.
दरम्यान मविआतल्या तिन्ही पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्री हा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केल्याचं दिसतंय. मुख्यमंत्रीपदाचा कुणीही चेहरा नसेल, अशी भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाची आहे. मात्र दुसरीकडे जाहीर सभांमधून संजय राऊत मुख्यमंत्री ठाकरेंच्या नावावर कायम आहेत.