रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले, तो बाकडा मी शोधतोय; अनिल परब यांचा कदम यांना टोला
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले होते. याला आता अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.

शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले होते. ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता, याची माहिती काढावी अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलेलो आहे. मला सगळं कळत होतं. पण हे सारं कशासाठी करण्यात आलं. मला कोणीतरी सांगितलं की माँसाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. मग हे ठसे कशासाठी घेण्यात आले होते. नेमकं काय होतं?’ असे सवाल कदम यांनी उपस्थित केले होते. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.
रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले होते?
रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, ‘बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिकडे होतो. प्रत्येक क्षणाला मी जी घटना पाहिली, घडलेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. 2012 ला रामदास कदम कोणत्या बाकड्यावर झोपले होते, हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवर असं कुणाला कोणत्या बाकड्यावर झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते. तिथे 24 तास डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता. पथक होतं. असंख्य लोकं तिथे भेटायला येत होते.’
रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार
पुढे बोलताना परब म्हणाले की, ‘बाळासाहेब जिवंत आहेत हे सर्वांना माहीत होतं. त्यांची प्रकृती खालावली होती हे सर्वांना माहीत होतं. पण त्याचं राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्रात जे प्रश्न उभे राहिले आहेत त्यापासून लक्ष बाजूला न्यायचा हा या मागचा कुटिल डाव आहे. रामदास कदम म्हणतात नार्को टेस्ट करा. आमचं म्हणणं असं आहे की नार्को टेस्ट झाली पाहिजे. सत्य बाहेर आलं पाहिजे. मी कदमवर अब्रू नुकसानीचा दावा करत आहे. जी रक्कम येईल ही रक्कम दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना पाठवली जाईल. ही नार्को टेस्ट होण्याची गरज आहे.’
उद्धव ठाकरेंनी दिलेलं मंत्रिपद का स्वीकारलं?
रामदास कदम यांच्यावर बोलताना परब म्हणाले की, ‘रामदास कदम यांना बाळासाहेब गेल्यावर त्यांना 14-15 वर्षानंतर कंठ फुटला. बाळासाहेब 2012 ला गेले. 2014 ला रामदास कदम मंत्री झाले. त्यांना मंत्री केलं कोणी उद्धव ठाकरे यांनी. तेव्हा बाळासाहेब नव्हते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला रामदास कदम यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 2019 मंत्रिपद ओरपलं. 2019 ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडून जोपर्यंत सर्व मिळत होतं. उद्धव ठाकरेंकडून मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव ठाकरेंनी वाईट केलं असतं तर तुम्ही मराठा स्वाभिमानी समजता तुम्ही त्याचवेळी पक्ष सोडायला हवा होता. मी अशा माणसासोबत मी काम करणार नाही, असं सांगायला हवं होतं.’
