Anna Hazare : नवी दिल्लीत आंदोलन पेटले; आता अण्णा हजारे मैदानात उतरले
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन देशभर पसरलं आहे. आता या आंदोलनात अण्णा हजारे यांचीही एन्ट्री झाली आहे.

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पक्षाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनामुळे कॉक्रोच जनता पार्टी आणि पोलिसांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आता देशभरात पसरलं आहे. देशातील विविध राज्यात कॉक्रोच जनता पक्षाला पांठिबा मिळत आहे. आता या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची देखील एन्ट्री झाली आहे. त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील महिन्यापासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला 20 हून अधिक दिवस झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरून बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांचं रुग्णालयातूनही उपोषण सुरू आहे. तर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर अभिजीत दीपके यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अभिजीत दीपके यांच्यासहित कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलकांनी संपूर्ण दिल्ली दणाणून सोडली आहे. त्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहे. अनेक सेलिब्रिटी या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहे. आता या आंदोलनाला समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा देण्याची घोषणा केली.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे मौन आंदोलन करणार आहेत. ते सकाळी 11 ते 1 या वेळेत वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलन करणार आहेत. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी अण्णा हजारे यांची मागणी आहे. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही अण्णा हजारे यांनी केलं. तर या आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर मंतर” नाव देणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीनंतर आता अहिल्यानगरमधील अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे राजकीय नेते कसे पाहतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
