मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येताच अत्यंत मोठी घोषणा, वातावरण तापलं
मुंबई महापालिकेत महायुतीला मोठं यश मिळालं आहे, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मोठी बातमी समोर येत असून, त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली होती. मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला म्हणावं तेवढं यश या निवडणुकीत मिळवता आलं नाही. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट मराठी माणूस आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दरम्यान मुंबई महापालिकेचा निकाल लागताच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये बिहार भवन उभारलं जाणार आहे. मात्र यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
मुंबईमध्ये बिहार भवन उभारणार असल्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे. मुंबई पोर्ट स्ट्रस्ट परिसरात बिहार भवन उभारण्याचं सरकारचं नियोजन आहे. मात्र या बिहार भवनला मनसेकडून विरोध करण्यात आला आहे. मुंबईतल्या पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार भवन उभारलं जाणार आहे, बिहार सरकारनं याबाबत घोषणा करत प्रशासकीय खर्चाला मान्यता देखील दिली आहे. मुंबईमध्ये जे बिहार भवन उभारलं जाणार आहे, त्यासाठी बिहार सरकारने 314 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे. हे प्रस्तावित बिहार भवन 30 मजली असणार आहे. या बिहार भवनात एकूण 178 खोल्या असणार आहेत. या बिहार भवनात सरकारी अधिकारी पाहुणे आणि गरजू लोकांसाठी सोय करण्यात येणार आहे. मात्र हे बिहार भवन बांधण्यासाठी मनसेनं विरोध केला आहे.
या ठिकाणी आम्ही बिहार भवन वगैरे काही उभारू देणार नाही, जे काही बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात, त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोईसाठी एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढा मोठा पैसा खर्च करून तिकडेच का नाही रुग्णालय उभारत? असा थेट सवालच यावेळी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे.
तर प्रत्येक राज्यात वेगवेगळं भवन असतं, काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन होत आहे, मग काश्मिरच्या लोकांनी महाराष्ट्र भवनाला विरोध करायचा का? की काश्मीरमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन उभारू देणार नाही? उत्तर प्रदेशात आयोध्यमध्ये महाराष्ट्र भवन होत आहे, मग त्यांनी विरोध करायचा का? असं प्रत्युत्तर यावेळी भाजपकडून मनसेला देण्यात आलं आहे.
