एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या मनोज जरांगेंना अर्जून खोतकरांचा इशारा; ‘आमच्या शीर्ष नेत्याला टारगेट केलं तर…’
Arjun Khotkar On Manoj Jarange: तुम्हाला मिशीवर ताव देऊन बोलता येतं, आम्हालाही मिशा आहेत, असं म्हणत मनोज जरांगेंना अर्जुन खोतकरांनी इशारा दिला आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आंदोलकांवर सूड उगवल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे.
जालना शहरात आज शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक सूर पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेवरून आक्रमकता पाहायला मिळाली आहे. आमच्या शीर्ष नेत्याला टारगेट करून जर कोणी बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.
याशिवाय तुम्हाला मिशांवर ताव देऊन बोलता येत तर मग आम्हाला सुद्धा मिशा आहेत. तुम्ही चॅलेंज देऊ नका, असं देखील खोतकर यांनी म्हटलं आहे. अर्जुन खोतकर म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्नांमध्ये एकनाथ शिंदेंची मोलाची मदत आहे. हजारो लाखो लोकांना एकनाथ शिंदेंमुळे प्रमाणपत्र मिळाले आहे. ज्यांनी केलं त्यांनाच अशा पद्धतीने नाव ठेवणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली.
याआधी एकनाथ शिंदेंवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते की, एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान मराठा समाजानेच उंचावला आहे. मराठ्यांनीच त्यांना मुंबईत मान वर करून जगण्याची संधी दिली. पण आज हेच एकनाथ शिंदे मराठा आंदोलकांवर सूड उगवत आहेत. आमच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत आणि आयकर विभाग व इतर यंत्रणांमार्फत चौकशी सुरू केली जात आहे. पण शिंदे यांनी हे लक्षात ठेवावे की, तुमची सत्ता कायम टिकणार नाही. २०२९ ची निवडणूक जवळ येत आहे आणि तुम्हाला रडवण्यापासून आम्ही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले होते.
मनोज जरांगे यांनी असाही आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाविरोधात रणनीती आखण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. ज्यानंतर मंत्र्यांनी समाजातील सदस्यांना फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली. तुम्ही काहीही चूक केली नसेल तर भीती का बाळगायची? सरकार आम्हाला तुरुंगात टाकण्याची वाट पाहत असेल, तर आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. पण ना मराठा समाज, ना मी कोणासमोरही झुकणार नाही.
