Ashok Kharat Case : भोंदू खरातमुळे राजकारण्यांना फुटला घाम, आणखी दोन नेते अडचणीत
स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात हा भोंदूबाबा असल्याचे उघड झाले आहे. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत लोकांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर, हेमंत गोडसे, दीपक साळुंखे पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते अडचणीत आले आहेत. खरातचे नेते, सेलिब्रिटींशी असलेले संबंध आणि त्याचे धक्कादायक कारनामे एसआयटीच्या तपासात समोर येत आहेत, ज्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वयंघोषित ज्योतिषी, कॅप्टन म्हणवून घेणारा अशोक खरात हा प्रत्यक्षात भोंदूबाबा असल्याचे उघड झालं असून त्याने फसवून अनेक महिलांना जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचंही समोर आलंय. याचप्रकरणात तो सध्या पोलीस कोठडीत असून एसआयटीच्या तपासात त्याच्या आणखी कारनाम्यांची माहिती उघड झाली आहे. त्याने फक्त महिलांवर अत्याचार केलेला नाही तर अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली, जमिनी लुबाडल्या, त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत त्यांना फसवल्याचंही आता एकेक प्रकरणातून बाहेर येत आहे. सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरेल्या या भोंदू खरातचे अनेक राजकारणी, नेते, सेलिब्रिटींशीही संबंध होते, ते त्याची भेट घ्यायला यायचे अशी माहिती देखील समोर आली होती.
खरातशी असलेल्या जवळीकीमुळे एकीकडे रुपाली चाकणकर यांच्यावर टांगती तलवार असून त्यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही गमवावं लागलं. तसेच आणइखीही काही नेत्यांवरप विरोधकांनी आरोप केले आहेत. एकंदरच करात प्रकरणामुळे राज्यातील काही नेते, राजकारणी अडचणीत सापडले असून त्यांना चांगलाच घाम फुटला आहे. यामध्ये आता आणखी दोन नेत्यांचं नावंही समोर येत असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माजी खासदार हेमंत गोडसे वादात
माजी खासदार हेमंत गोडसे हे वादात सापडले आहेत. भोंदू अशोक खरातशी असलेल्या संबंधाबाबत गोडसे यांची चौकशी करावी अशी मागणी अंनिसने SIT कडे केली आहे. हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप अंनिसने केला आहे. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी अशोक खरातला हात दाखवला आणि भविष्य जाणून घेतलं, असा व्हिडीओ समोर आला होता . तर काल सुषमा अंधारे यांनी देखील हेमंत गोडसेंवर लोकसभा निवडणुकीतील तिकीटाबाबत गंभीर आरोप केला होता. त्यामुळेच आता हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अशोक खरात आणि सांगोल्याचे माजी आमदार पाटील यांचा फोटो व्हायरल
तर दुसरीकडे सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचंही नावं आता चर्चेत येत आहे. त्याचं कारण म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा फोटो व्हायरल झाला आहे. दीपक आबा साळुंखे पाटील हे भोंदू खरात याच्या गळ्यात तुळशीचा हार घालून अन् वीणा देऊन सत्कार करतानाचा फोटो व्हायरल झालाय. दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर देखील उपस्थित असल्याचं त्या फोटोतून समोर आलं आहे.
भोंदू अशोक खरात आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे आर्थिक संबंध असल्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता. मात्र आपण त्यांना ओळखत नसल्याचा दावा पाटील यांनी केला. पण आता भोंदू अशोक खरात आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांचा फोटोच समोर आल्याने सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं असून त्यांच्याही अडचणी वाढू शकतात.
