औरंगाबादच्या गंगापूररोडवर ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

गंगापूर रोडवरील विराज हॉटेल जवळ ही घटना घडली. या आगीमुळे काही काळ रस्त्यावर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. सुदैवाने ट्रकमधील बिघाड वेळीच लक्षात आल्याने चालकाचे प्राण वाचले.

औरंगाबादच्या गंगापूररोडवर ट्रकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली
गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग, दुसऱ्या छायाचित्रात औरंगाबादेतील इलेक्ट्रॉनिक दुकानांना लागलेल्या आगीचे दृश्य


औरंगाबाद: जिल्ह्यातील गंगापूर रोडवर (Gangapur Road, Aurangabad)  ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की, संपूर्ण परिसरात आग आणि धुराचे लोळ उठत होते. ट्रक चालक रस्त्यावरून जात असताना काहीतरी बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने रस्त्याच्या खाली ट्रक घेण्याचा प्रयत्न केला. ट्रक रस्त्याच्या खाली कोसळला.

सुदैवाने चालक बचावला

ट्रक रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचे मोठे लोळ ट्रकमधून बाहेर पडू लागले. गंगापूर रोडवरील विराज हॉटेल जवळ ही घटना घडली. या आगीमुळे काही काळ रस्त्यावर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. सुदैवाने ट्रकमधील बिघाड वेळीच लक्षात आल्याने चालकाचे प्राण वाचले.

शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग

दुसऱ्या एका घटनेत, औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील अमरप्रीत चौकातील एका ऑइलच्या दुकानाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. यात लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरप्रीत चौकातील आनंद प्लाझा येथे नवजीवन डिस्ट्रिब्युटर्स, आणि नवजीवन इंजिनिअरिंग नावाचे ऑइल, इलेक्ट्रॉनिक, बॅटरी व इतर स्पेअर पार्टचे मोठे दुकान आहे. गुरुवारी रात्री दुकानाला आग लागल्याची माहिती दुकान मालक धनंजय व्यंकटेश देशपांडे यांना समजली. त्यांनी अग्निशमन विभागाला तत्काळ कळवले. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पण, आगीची तीव्रता आणि वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने जेसीबीच्या साहाय्याने भिंत पाडून अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण आणले. ‌रात्री12 ते सकाळी पाच वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. ही आग विझविण्यासाठी चार बंब लागल्याची माहिती अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली.

इतर बातम्या- 

Railway: नातेवाईकांना सोडायला जाताय? आता प्लॅटफॉर्म तिकिट काढाच, दर 30 चे 10 रुपयांवर आले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI