Railway: नातेवाईकांना सोडायला जाताय? आता प्लॅटफॉर्म तिकिट काढाच, दर 30 चे 10 रुपयांवर आले

Railway: नातेवाईकांना सोडायला जाताय? आता प्लॅटफॉर्म तिकिट काढाच, दर 30 चे 10 रुपयांवर आले
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होण्यापूर्वी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील तिकिट (Platform Ticket) 10 रुपयात खरेदी करता येत होते. मात्र प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने (Indian Rail Administration) गेल्या दीड वर्षांपासून प्लॅटफॉर्मच्या तिकिटांचे दरच वाढवले होते. त्यामुळे नातेवाईकांना सोडायला येणाऱ्या लोकांची गर्दी चांगलीच आटोक्यात आली होती. आता मात्र हे दर 30 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आले आहेत. गुरुवारी, रेल्वे प्रशासनाने   या संदर्भातील  घोषणा केली.

जवळच्या स्टेशनचे तिकिट काढण्याची शक्कल

प्लॅटफॉर्मच्या तिकिटाचे दर परवडत नसल्याने नागरिकही अनोखी शक्कल लढवत होते. कोरोना काळामुळे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे तिकिट 30 रुपये करण्यात आले होते. मात्र नागरिकांना हे दर परवडत नव्हते. अशा वेळी अनेक नागरिक जवळच्याच एखाद्या स्टेशनपर्यंतचे तिकिट काढत असत. अर्थातच हे तिकिट 25 रुपये , 20 रुपये असल्याने नागरिकांच्या सोयीचे होते. त्यामुळे एखाद्या नातेवाईकाला स्टेशनवर सोडायला जायचे असल्यास प्लॅटफॉर्म तिकिटाऐवजी जवळच्या स्टेशनचे तिकिट काढण्याची शक्कल अनेकजण वापरत होते. मात्र आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना थेट हेच तिकिट काढणे परवडू शकते.

प्रामाणिक नागरिकांना दरवाढीचा फटका

अनेक नागरिक उपरोक्त शक्कल लढवत असले तरीही प्रामाणिक नागरिकांना मात्र प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरवाढीचा फटका बसत होता. अनेकदा आपल्या लेकीला, म्हाताऱ्या आई-वडिलांना स्टेशनबाहेर सोडूनच नागरिकांना परत फिरावे लागत होते. त्यामुळे आपले जवळचे माणसं रेल्वेत चढून नीट बसतात की नाही, ही चिंता त्यांना सतावत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पुन्हा एकदा 10 रुपये करण्यात आले आहेत. मात्र औरंगाबादसाठीचे दर अद्याप कमी झाले नव्हते. हे दर कमी करण्याची मागणी विविध संघटनांनी उचलून धरली होती. अखेर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्व रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिट दर गुरुवारपासून पूर्ववत 10 रुपये करण्यात आले.

दररोज 250 ते 300 तिकिटांची विक्री

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मागील वर्षी रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2021 मधील जून महिन्यात टप्प्या-टप्प्याने रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या. सध्या पॅसेंजर वगळता इतर बहुतांश रेल्वे सुरु जाल्या आहेत. औरंगाबाद स्टेशनवर दररोज सरासरी 250 ते 300 प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होते. 30 रुपयांचे दर पाहता मागील दीड वर्षात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीतून तिप्पट कमाई केली.

या रेल्वे सेवाही सुरु करण्याची मागणी

दरम्यान प्रवाशांनी नांदेड-मनमाड, औरंगााबद-अकोला, नांदेड-औरंगाबाद, अकोट-नांदेड, अकोट-परळी, नांदेड-बिदर, औरंगाबाद-उस्मानाबाद या दरम्यान डेमू लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच औरंगाबाद-नागपूर डेली एक्सप्रेस, नांदेड-बिकानेर, नांदेड-पुणे, कोल्हापूर-नागपूर या रेल्वे सुरु करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे. या रेल्वे सेवाही टप्प्या-टप्प्याने सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

इतर बातम्या- 

मुंबईत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल 5 पटीने वाढ, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बोनसची आज घोषणा होणार, किती पैसे मिळणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI