सोयगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ, दहा दिवसात नऊ जनावरांवर हल्ला, मजूरांमध्ये दहशत, शेताकडे फिरकेनात

जनावरांनंतर आता हा माणसांवरही हल्ला करू शकतो, या भीतीने अवघ्या गावात दहशत पसरली आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर शेती-शिवारात जाण्यास घाबरत आहेत.

सोयगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ, दहा दिवसात नऊ जनावरांवर हल्ला, मजूरांमध्ये दहशत, शेताकडे फिरकेनात
औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात बिबट्याचे जनावरांवर हल्ले

औरंगाबाग: जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील दस्तापूर काळदरी परीसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने गावातील अनेक जनावरांवर हल्ला (Leopard attack in Soygaon) करत त्यांचा जीव घेतलाय. गेल्या दहा दिवसातच बिबट्याने गाय, वासरू, शेळी अशा नऊ जनावरांवर हल्ला केलाय. त्यामुळे येथील गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलीच दहशत बसली आहे. गावकरी एकट्याने जनावरे घेऊन जाण्यासही घाबरत आहेत.

डोंगरावरून बिबट्या खाली येताना पाहिलाय….

सोयगाव तालुक्यातील पत्रकार भावराव मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्तापूर काळदरी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. रात्रीतून या बिबट्याने गोठ्यातील जनावारांवर हल्ला करून ठार केले आहे. त्यात येथील रशीद शेख यांची तीन जनावरे, ज्ञानेश्वर मनगटे यांचे एक वासरू, जनार्दन झेंडे यांची दोन वासरं, किसन लाडके यांची दोन जनावरे, सखाराम मदे यांची एक शेळी अशी जवळपास नऊ जनावरे फस्त केली आहेत. सुरुवातीला झालेल्या जनावरांवरील हल्ल्यामुळे गावकऱ्यांनी पाळत ठेवली असता, डोंगरातून हा बिबट्या खाली उतरतानाही अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहे. जनावरांनंतर आता हा माणसांवरही हल्ला करू शकतो, या भीतीने अवघ्या गावात दहशत पसरली आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर शेती-शिवारात जाण्यास घाबरत आहेत. गुरे-ढोरे चरणारे एक समूह बनवून एकाच जागी आपली जनावरे चारीत आहेत.

बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी

बिबट्याच्या भीतीने दस्तापूर काळदरी भागातील गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या प्रकरणी वनविभागाने तत्काळ कारवाई करून बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी गावाचे सरपंच मनोज बयास तथा उपसरपंच दशरथ शिंगाडे यांनी केली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी शेतात जाताना घुंगराची काठी व टॉर्च सोबत घेऊनच जावे, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत. तसेच गावकरी तसेच शेतकऱ्यांनी बिबट्या जेरबंद होईपर्यंत एकट्याने फिरणे टाळावे. डोंगर परिसरात जायचे असल्यास समूहाने जावे, अशी सूचना देण्यात आली आहे. सदर हल्ल्यांबाबत वरिष्ठांना सूचना दिल्याची माहिती वनरक्षक सुरेंद्र सोनार यांनी दिली आहे.

इतर बातम्या-

अंगणातून फरफटत ऊसाच्या शेतात नेलं, जुन्नरमध्ये चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

नाशकात दुसरा बिबट्याही पकडला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI