शरीर थकलं… आवाज क्षीण… मनोज जरांगे यांची समाजाला कळकळीची विनंती; म्हणाले, अटीतटीची लढाई…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अटीतटीच्या लढाईसाठी समाजाला कळकळीचे आवाहन केले आहे. शरीर थकले असले तरी त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. मुंबई मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या अंतरवली येथे होणाऱ्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे. घरी बसून चुकीचा संदेश देऊ नका, तर मोठ्या संख्येने येऊन आपली ताकद दाखवा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता अंतरवलीत बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख आणि मार्ग सांगितला जाणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधवांना उद्या अंतरवलीत येण्याची कळकळीची विनंती केली आहे. जरांगे यांचं शरीर थकलेलं आहे. आवाज क्षीण झालाय. बोलताना दम लागतोय. मात्र, त्यांची इच्छा शक्ती प्रबळ आहे. ही अटीतटीची लढाई आहे. कुणी घरी बसू नका. सर्वांनी उद्या अंतरवलीत या. घरी बसल्याने चुकीचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे उद्याच तुमच्या ताकदीची झलक दाखवा, अशी कळकळीची विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधून ही विनंती केली आहे. गरजवंत मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी उद्या दुपारी 12 वाजता अंतरवलीत बैठक होणार आहे. शक्यतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातील बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावं. कुणी हयगय करू नका. कुणाला वाटत असेल आम्ही मोबाईलवर बैठक पाहू. टीव्हीवर बैठक पाहू. तर तसं करू नका. कारण आता अटीतटीचा सामना आहे. घरी बसून, टीव्हीवर पाहून बैठका करण्याचे दिवस नाहीत. प्रत्येक जण उद्या अंतरवलीत दिसला पाहिजे. मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.
तर चुकीचा संदेश जाईल
टीव्हीवर पाहून मुंबईला जाण्याची तारीख कळल्यावर त्या तारखेला मुंबईला जाऊ, असं काहींना वाटत असेल. काही कारणाने अंतरवलीला जाता येणार नाही, असं वाटत असेल त्यांनी हा अटीतटीचा सामना आहे, एवढं लक्षात ठेवावं. घरी बसू नका. प्रत्यक्ष मोठ्या संख्येने अंतरवलीत या. तुम्ही सर्व एकत्र आहात हे मला आणि राज्याला माहीत आहे. पण तुम्ही गैरहजर राहिल्याने त्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि पुढील समस्या तयार होऊ शकतात. उद्या यायला शक्य नाही झालं तर ठिक आहे. पण ज्यांना शक्य आहे, त्यांनी प्रत्यक्ष बैठकीला यायचंच आहे, असं जरांगे यांनी आवाहन केलं.
मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था करा
मुंबईला जाण्याच्या मार्गावर राज्यातील बांधवांनी उपस्थित राहायचं आहे. ज्यांना मुंबईला सोबत यायचं आहे, त्यांनी त्याच मार्गाने यायचं आहे. दुसऱ्या मार्गाने मुंबईला यायचं नाही. ज्यांना शक्य नाही, त्यांनी सहकुटुंब रस्त्यावर येऊन आशीर्वाद द्यायचे आहेत. मुंबईला जाताना मुक्काम करत करत जावं लागणार आहे. त्यामुळे ज्या गावात, शहरात मुक्काम होईल, तिथल्या बांधवांनी रात्रीच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करायची आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.
