Weather: औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप, पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह बरसात, काय आहे हवामानाचा अंदाज?

Weather: औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप, पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह बरसात, काय आहे हवामानाचा अंदाज?
पुढील दोन दिवस राज्यभरात पावसाचा जोर कमी होत जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

औरंगाबाद: 14 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातून मान्सूनचे माघार घेतली असली तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या ठिकाणीही काल 16 ऑक्टोबर रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याने (meteorological department) वर्तवला आहे.

औरंगाबादेत रात्रभर रिपरिप

औरंगाबाद शहरात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. शहरासह वाळूज परिसरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दौलताबाद, खुलताबाद, सोयगाव परिसरालाही रात्री अकरानंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे मान्सून एकदाचा परतला म्हणत निःश्वास टाकलेल्या शेतकरी आणि नागरिकांना पुन्हा एकदा नव्या संकटाला सामोरे जावे लागले.

रात्री अनेक ठिकाणी वीज गुल्ल

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात काल रात्री दहानंतर पाऊस सुरु झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसात झाली. यामुळे औरंगाबाद शहराची तसेच खुलताबाद, दौलताबाद परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान मध्यरात्रीतून काही ठिकाणी पुरवठा सुरळीत झाला तर काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा खंडित झाले आहे. लोणीखुर्द परिसरात 17 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

जवाद टळले, पण प्रभाव जाणवला

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही भागाला जवाद चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हवामान स्थिती बदलल्यामुळे या वादळानं दिशा बदलली. म्हणून महाराष्ट्रात तरी या वादळाचा फटका बसणार नाही, अशी चिन्हे होती. मात्र बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा पश्चिम भाग, कोकण किनारपट्टी वगळता कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत या पावसाची तीव्रता वाढेल. या काळात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होत जाईल आणि त्यानंतर हळू हळू थंडीची सुरुवात होईल, असा अंदाज औरंगाबाद येथील हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.

औरंगाबादची भूजल पातळी 6,50 फूट वाढली

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अखंड बरसातीमुळे औरंगाबाद जिल्ह्याची भूजल पातळी साडेसहा फुटांनी वाढली आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाई होण्याची चिन्हे नाहीत, असे म्हटले जात आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 14 फुटांनी भूजल पातळी वाढली आहे.

इतर बातम्या-

पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच…

नाशिकमध्ये पुन्हा पाऊस मुक्कामी; हवामान विभागाचा अंदाज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI