मोहन भागवत यांना प्रायश्चित घ्यावं लागेल… संजय राऊत असं का म्हणाले? काय घडलं?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी 'बकवास सरकार' स्थापन केल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याची मागणी केली. महाराष्ट्र आणि देशाच्या छाताडावर बसवलेले हे सरकार हटवण्यासाठी भागवतांनी प्रयत्न करावेत, असे राऊत म्हणाले. दुष्काळ, शेतकरी समस्या आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक प्रायश्चित घ्यावं. बकवास आणि थापाडं सरकार महाराष्ट्र आणि देशाच्या छाताडावर बसवलं आहे. ते घालवण्यासाठी मोहन भागवत यांनी प्रयत्न केले पाहिजे. या बकवास सरकारांची किंमत महाराष्ट्र मोजत आहे. खऱ्या अर्थाने भागवतांनी महाराष्ट्राला आणि देशाला मोकळा श्वास घेण्याची संधी दिली पाहिजे. आजच्या दिवशी भागवत यांनी हा निश्चय केला पाहिजे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. राऊत नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भागवत यांना टोले लगावले.
मोहन भागवत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना काय शुभेच्छा द्याल? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हा टोला लगावला. मोहन भागवत आणि मराठवाड्यातील दुष्काळाचा काय संबंध आहे? भागवतांनी दुष्काळ नजरेखालून घातला पाहिजे. ते सर्व विषयावर बोलतात. ते लंडनला जाऊन बोलतात. ते अमेरिकेला जाऊन बोलतात. ते धर्मावर बोलतात. ते कर्मावर बोलतात. पण त्यांच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या सरकारांमध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे. भागवत त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून मोठं सामाजिक कार्य करत असतात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हा अमानुषपणा आहे
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. मनोज जरांगे पाटील यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. काही विषयावर जरांगेंशी मतभेद असू शकतात. सर्वच मागण्या मान्य करू शकत नाही. पण 13 दिवसापासून एका मोठ्या समाजाचा नेता अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसला आहे. तुम्ही चर्चेचे दरवाजे बंद करून प्रशासनाला आदेश दिले आहेत. तिकडे फिरकू नका, असं सांगितलं आहे. हा अमानूषपणा आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
ते रावण, तुम्ही कंस
आम्ही आज नांदेडमध्ये आंदोलन करत आहोत. आजच्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या वाया गेलेल्या पिकांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे. संत्र्याच्या बागा, सोयाबीन यावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे. काय केलं फडणवीसांनी? केंद्राकडे बोट दाखवू नका. ते रावण आहेत, तुम्ही कंस आहात. तुमचंच सरकार आहे. निवडणुकीत हजार बाराशे देऊन मतं घेता. आता महाराष्ट्र त्याची किमत मोजत आहे. कोरडा दुष्काळ पडला आहे. त्यांचं डेलिगेशन येईल आणि माहिती घेतील. अभ्यास करत राहतील. अभ्यास कधी पूर्ण होईल का? असा सवाल त्यांनी केला.