झकमारी केली अन् मंत्री झालो… संजय शिरसाट यांच्या विधानाने खळबळ; महायुतीच्या स्टेजवरच…
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या "२०२२ ला आम्ही झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो" या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान करत, २०२० मधील उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील बंडाकडे लक्ष वेधले.

आम्ही 2022ला झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो. त्यात सुद्धा खूप स्पर्धा होत्या, असं खळबळजनक विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या प्रचारसभेतच ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बंडावर बोलताना शिरसाट यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी मी जे काही आहे, ती केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांची पुण्याई असल्याचंही म्हटलंय.
माझा मतदारसंघ फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. 4 लाख मतदार असलेला माझा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मी 30 टक्के ठिकाणीही पोहोचू शकत नाही. कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात अर्धा वेळ जातो, त्यानंतर प्रचाराच्या कामाला लागावं लागतं. निवडणूक लढणं फार जिकरीचं काम आहे. सतीशराव (सतीश चव्हाण) कसं करतील काय माहीत? पदवीधर इच्छुक कमी असतात, त्यातले एक नाव फायनल करावं लागतं, असं संजय शिरसाट म्हणाले.
अन् चौथ्यांदा निवडून आलो
पहिल्या निवडणुकीचा अनुभव वेगळा असतो. अनेकजण इच्छूक असतात. पहिल्यांदा मी निवडून आल्यावर दुसऱ्यांदा वाटलं आता काही खरं नाही. तिसऱ्यांदा वाटल आता तर काहीच खरं नाही. असं करता करता मी चौथ्यांदा निवडून आलो, असं शिरसाट यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
ते आम्हा दोघांनाच माहीत
मला शेवटी बोलायला उभं केलं आहे, कारण माझी कोणतीही शाळा नाही. माझं कोणतंही कॉलेज नाही. त्यांनी मला सांगितले बाबा फक्त तू बोल. बाकी काही करू नको. आम्ही आमचं पाहून घेतो. हा एक प्रकारचा अन्याय आहे. व्यासपीठावर बसल्यावर हलता येत नाही, पण मी व्यासपीठावर नसतो तर कॅमेऱ्यावाल्याने संजय शिरसाट नाराज असल्याची बातमी चालवली असती. अरे हा सतीश चव्हाण आहे. तुम्ही म्हणताय काल त्यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांनी दोन दिवसापूर्वी फॉर्म आणला होता, हे आमच्या दोघांनाच माहीत आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आयुष्यात पदवीधर झालो तरी ही निवडणूक लढणार नाही एवढं नक्की सांगतो. 76 तालुके. प्रचाराला दिवस 18. त्यात दसरा, त्यात दुष्काळ. 76 तालुक्याचा दौरा करायचा आणि उरले दिवस फक्त 18, असं गणितच त्यांनी मांडलं.
उगाच आव आणू नका
यावेळी त्यांनी सतीश चव्हाण यांना जिंकण्याचा कानमंत्रही दिला. उगाच आव आणू नका. कार्यकर्त्यांना खूश ठेवा, असा सल्ला देतानाच काही कमी पडलं तर मी आहेच, असंही शिरसाट म्हणाले. आपल्याला केवळ कार्यकर्त्यांमुळेच विजय मिळतो. विक्रम काळे यांनी विक्रम केला आहे, तुझ्या वडिलांची पुण्याई आहे. आमचं काही पुण्य नाही. आमच्यावर शिवसेनाप्रमुखांची पुण्याई आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
